पाचही जागा भाजपाकडे : मुलाचे डिपॉझिट वाचविण्यातही अपयश यवतमाळ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मावळते अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा पुरता सफाया झाला आहे. येथे काँग्रेसच्या ताब्यातील पाचही जागा भाजपाने पटकाविल्या आहेत. एवढेच नव्हे तर माणिकरावांना आपल्या मुलाचे डिपॉझिटही वाचविता आलेले नाही. यवतमाळ जिल्ह्यात पूर्वी सात पैकी तब्बल पाच आमदार काँग्रेसचे होते. या निवडणुकीत मात्र या पाचही जागा काँग्रेसच्या हातून गेल्या आहेत. राज्यात काँग्रेसची वाताहत झाली. यवतमाळ जिल्ह्यात तर सर्वाधिक दैनावस्था काँग्रेसची झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी व शिवसेनेने अनुक्रमे मनोहरराव नाईक (पुसद) आणि संजय राठोड (दिग्रस) यांच्या रुपाने आपल्या जागा कायम राखल्या. संजय राठोड यांची मतांची आघाडी राज्यात सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. हे दोनही उमेदवार मताधिक्याने निवडून आले. संजय राठोड यांनी आपली विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. तर यवतमाळचे भाजपाचे उमेदवार मदन येरावार यांना निसटता विजय प्राप्त करता आला. त्यांना शिवसेनेचे सामान्य उमेदवार संतोष ढवळे यांनी जबर टक्कर दिली. वणी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे संजीव रेड्डी बोदकुरवार अनपेक्षितरीत्या निवडून आले. काँग्रेसचे शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार या दिग्गजांसह उमरखेडचे आमदार विजय खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुरके तब्बल ४० हजार मतांनी पराभूत झाले. जिल्ह्यातील भाजपाचे चार उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेत जात आहे. पक्षाच्या दृष्टीने ते नवे चेहरे ठरले आहे. जिल्ह्यात नरेंद्र मोदींची सभा झालेली नसताना भाजपाने तब्बल पाच जागा मिळविणे हे मोठे यश मानले जात आहे. भाजपा व राष्ट्रवादीतून ऐनवेळी शिवसेनेत उडी मारणाऱ्या दोन उमेदवारांना मतदारांनी नाकारले. (जिल्हा प्रतिनिधी)पुत्र राहुल ठाकरे चौथ्या क्रमांकावरमाणिकराव ठाकरे यांना किमान आपल्या गृहजिल्ह्यातही काँग्रेस वाचविता आली नाही. माणिकरावांनी यवतमाळच्या विद्यमान आमदार नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापून ते मुलगा राहुल ठाकरे यांना बहाल केले. सर्वांचा विरोध पत्करुन आणि ऐनवेळी पद सोडण्याची धमकी देऊन माणिकरावांनी मुलासाठी तिकीट आणले असली तरी त्यांना त्याला विजयी करता आलेले नाही. निवडणूक काळात माणिकरावांनी आपली संपूर्ण शक्ती यवतमाळात खर्च केली. त्यासाठी राज्यातील अन्य उमेदवारांना वाऱ्यावर सोडले गेले. मात्र त्यानंतरही यश आले नाही. राहुल ठाकरे तब्बल चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.
प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा सफाया
By admin | Updated: October 20, 2014 00:41 IST