बुटीबोरी : सातगाव ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेससमर्थित पॅनलचे योगेश सातपुते यांची तर उपसरपंचपदी बसपाच्या प्रविना शेळके विजयी झाल्या. १५ सदस्य संख्या असलेल्या सातगाव ग्रामपंचायतमध्ये १५ जानेवारीला निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँगेस-राष्ट्रवादी समर्थित पॅनलचे सात उमेदवार, भाजपसमर्थित पॅनलचे सहा उमेदवार, तर बसपासमर्थित पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले होते. कोणत्याही पॅनेलकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांच्या नजरा लागला होती. गुरुवारी झालेल्या सरपंच व उपसरपंचाच्या निवडणुकीत येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससमर्थित पॅनल आणि बसपाने आघाडी करीत भाजपला धक्का दिला. सरपंचपदाच्या निवडणुकीत काँगेस-राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेलचे उमेदवार योगेश सातपुते यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना-भाजपा पॅनलचे उमेदवार फकिरा बाळकृष्ण कुलमथे यांचा पाच मतांनी पराभव केला. सातपुते यांना १०, तर कुळमथे यांना पाच मते मिळाले. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत प्रवीणा शेळके यांना नऊ, तर प्रतिस्पर्धी उमेदवार सागर मोहीतकर यांना सहा मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार ज्योती भोसले यांनी काम पाहिले.
सातगाव ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस-बसपाची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST