सावनेर: सावनेर तालुक्यातील २ जिल्हा परिषद सर्कल आणि ३ पंचायत समिती गणासाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने गत निवडणुकीत विजयी उमेदवारांना याही वेळी संधी दिली आहे. केळवद सर्कलमध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या पत्नीला कॉंग्रेसने मैदानात उतरविले आहे. याउलट भाजपाने गत निवडणुकीतील बडेगाव गणातील उमेदवार वगळता यावेळी सर्व नवीन उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. तालुक्यात जि.प., पं.स.साठी कॉंग्रेस-भाजपामध्ये थेट सामना होईल; मात्र यात शिवसेनेची काय भूमिका राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केळवत सर्कलमध्ये काँग्रेसच्या सुमित्रा कुंभारे आणि भाजपाच्या संगीता मुलमुले यांच्यात थेट लढत होईल. याच सर्कलमधून काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोर कुंभारी विजयी झाले होते. वाकोडी सर्कलमध्ये गतवेळच्या विजयी उमेदवार ज्योती शिरस्कर या मैदानात आहेत. त्यांचा भाजपच्या आयुषी धपके यांच्याशी सामना होईल. वाकोडी सर्कलमध्ये भाजपने माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास मदनकर यांच्या पत्नी ऐवजी नवीन उमेदवार आयुष धपके यांना संधी दिली आहे.
बडेगाव गणात काँग्रेसच्या भावना चिखले, भाजपच्या जयश्री चौधरी आणि शिवसेनेच्या रेखा भुजाडे यांच्यात तिरंगी सामना होईल. यात शिवसेनेच्या उमेदवारांची मते निर्णायक ठरणार आहेत.
वाघोडा गणात काँग्रेसच्या ममता केसरे याही निवडणुकीत नशीब आजमावत आहे. त्यांच्या विरोधात भाजपच्या भागती आठनकर तर शिवसेनेच्या जिजाबाई फुले रिंगणात आहेत.
नंदागोमुख गणात काँग्रेसने गोविंद ठाकरे यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांना भाजपचे माणिक बल्की टक्कर देत आहेत. शिवसेनेचे धनराज मोवाडे हेही येथे रिंगणात आहेत.
सध्या सावनेर पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार यशस्वी झाले किंबहुना ठरले तरी पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता कायम राहणार, हे मात्र निश्चित. गत निवडणुकीत सावनेर पंचायत समितीत सर्वच १२ सदस्य कॉंग्रेसचे होते. यातील तीन गणात पोटनिवडणूक होत आहे.