लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेच्या सर्वच आरोग्य केंद्रावर कोरोनाची चाचणी व कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. परंतु अनेक ठिकाणी या दोन्ही सोयी एकाच इमारतीत आहे. यांचे कक्ष वेगवेगळे असले तरी दोन्हीमध्ये २०० फुटापेक्षा कमी अंतर राहत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास हे केंद जबाबदार ठरत आहेत. ‘लोकमत’ चमूने काही केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, चाचणीसाठी आलेले व लसीकरणाच्या नोंदणीचा रांगा जवळजवळ होत्या. काही जण चाचणी झाल्यावर लसीकरणाच्या रांगेत लागतानाही आढळून आले.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने दुपारी ४ नंतर वैद्यकीय सोयी वगळता इतर सर्व प्रतिष्ठान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नियम धुडकविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तोंडावर मास्क नसणाऱ्यांवर व गर्दी होत असलेल्या ठिकाणांवरही कारवाईचा धडका सुरू आहे. परंतु प्रादुर्भाव पसरविण्यास मनपाचेच आरोग्य केंद्र कारणीभूत ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
- डीक दवाखान्यात ओपीडी व चाचणी केंद्र एकाच इमारतीत
धरमपेठ येथील मनपाच्या डीक दवाखान्याच्या एकाच इमारतीत ओपीडी व चाचणी केंद्र आहे. दवाखान्याच्या प्रवेशद्वारावरील उजव्या भागात कोरोनाची चाचणी होते तर, त्याच दरवाजातून ओपीडीमधून समोर जावे लागते. यामुळे येथे धोका होण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून येते.
- ‘आयसोलेशन’मध्ये लसीकरण व कोविड रुग्णालय एकाच ठिकाणी
इमामवाडा येथील मनपा आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये १५ खाटांचे कोविड हेल्थ सेंटर आहे. सध्या हे सेंटर रुग्णाने फुल्ल आहे. हॉस्पिटलच्या मध्यभागी ‘ओपीडी’ आहे तर, रुग्णालयाच्या डाव्या भागात लसीकरण केंद्र आहे. हॉस्पिटलच्या एकाच इमारतीत हे तिन्ही केंद्र असून, त्यांच्या जाण्या-येण्याचा एकच मार्ग आहे. इमारतीला लागून असलेल्या दुसऱ्या इमारतीत कोरोना चाचणी केंद्र आहे. विशेष म्हणजे, लसीकरण केंद्र नोंदणीची रांग व चाचणी केंद्राच्या रांगेत २०० मीटरचे अंतरही राहत नाही.
- बाभुळखेडा केंद्रावर लसीकरण व चाचणी केंद्रामध्ये कपड्याची भिंत
नवीन बाभुळखेडा येथील पंचशील नाईट हायस्कूलमध्ये कोरोना चाचणी केंद्र आहे. संशयित रुग्णांची चाचणी मुख्य रस्त्यापासून केवळ १५ फुटाच्या आत केली जाते. हायस्कूलला लागून असलेल्या आयुर्वेदिक डिस्पेन्सरी केंद्रात लसीकरण होते. परंतु याच्या नोंदणीची रांग व चाचणीच्या रांगेत केवळ ग्रीन पडद्याची भिंत आहे. धक्कादायक म्हणजे, चाचणी झालेले काही लोक लसीकरण नोंदणीच्या रांगेत लागत होते. त्यांना थांबविणारे तिथे कुणी सुरक्षा रक्षकही नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले. विशेष म्हणजे, चाचणी केंद्र रस्त्याच्या केवळ १५ फुटाच्या अंतरावर आहे. यामध्ये केवळ हारफुलांचे दुकान आहे. याकडे अद्यापही मनपाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.