ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 20 - बहुजन समाज मुक्ती आंदोलनाच्या अध्यक्षाच्या कुटुंबीयांनी दुसºया एका महिलेला मारहाण करून शिवीगाळ केली. आमदार निवासातील खोली क्रमांक २०७ मध्ये बुधवारी दुपारी ही घटना घडली. मात्र, ठाण्यात पोहचूनही तक्रारीसाठी टाळाटाळ होत असल्याने सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी रात्री घटनेची ‘अदखलपात्र’ नोंद घेतली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बहुजन समाज मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष सुरेश डोंगरे (वय अंदाजे ४५ वर्षे, रा. कळमेश्वर) वाहन बिघडल्यामुळे बुधवारी दुपारी आमदार निवासातील खोली क्रमांक २०७ मध्ये पोहचले. त्यांच्या संघटनेची एक महिला पदाधिकारी याचवेळी तेथे संघटनेच्या संबंधाने चर्चा करण्यासाठी तेथे आली. ही माहिती कळताच डोंगरे यांच्या परिवारातील सदस्य दुपारी २ वाजता आमदार निवासात धडकले. त्यांनी महिलेला ‘तू येथे काय करीत आहे’, अशी विचारणा करून मारहाण केली. या प्रकरणाचा बोभाटा झाल्याने आमदार निवासातील कर्मचाºयांनी पोलिसांना कळविले. ठाणेदार सत्यवीर बंडीवार आणि त्यांच्या सहकाºयांनी लगेच धाव घेतली. त्यानंतर सर्वांना सीताबर्डी ठाण्यात आणण्यात आले. महिलेने आपल्या पतीला फोन करून नागपुरात बोलविले. त्यानंतर तक्रार करावी की करू नये, याबाबत बरेच मंथन झाले. बदनामीच्या धाकाने तक्रार करण्याचे टाळण्यात येत असल्याचे पाहून उद्या भलतेच आरोप होऊ नये म्हणून पोलिसांनी ‘सेफ साईड‘ साठी एक तक्रारअर्ज लिहून घेत प्रकरणाची एनसी (अदखलपात्र) नोंद घेतली. या प्रकारामुळे उलटसुलट चर्चेला उउधाण आले आहे.