लाखोंचा जीएसटी कुणाच्या घशात : संचालकांनीच घेतला आक्षेप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका कर्मचारी सहकारी बँकेत संगणकासाठी कर्ज वाटप करताना बोगस कोटेशन जोडून प्रकरणे मंजूर करण्यात आलेली आहेत. यात कपात करण्यात आलेला लाखों रुपयांचा जीएसटी कुठे गेला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संगणक वाटपातील घोळासंदर्भात बँकेच्या लेखा परीक्षणात आक्षेप नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बंद असलेल्या एकाच फर्मचे कोटेशन जोडून मागील तीन वर्षांपासून संगणकासाठी कर्ज वाटप सुरू आहे. यावर बँकेचे संचालक व मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी बँकेच्या अध्यक्षांकडे आक्षेप नोंदविला आहे.
कर्ज वाटप करताना संबंधित फर्मकडून ९ टक्के जीएसटी शासनाच्या तिजोरीत जमा केला जातो. परंतु अस्तित्वात नसलेल्या फर्मच्या कोटेशनवर शेकडो प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. यात कर्जधारकाकडून वसूल करण्यात आलेला हा जीएसटी गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, मागील तीन-चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती आहे. यात मोठे रॅकेट सक्रिय असल्याची मनपात चर्चा आहे.
...
एकाच कर्मचाऱ्याला चार-पाचवेळा संगणकासाठी कर्ज
एकाच कर्मचाऱ्याला चार ते पाचवेळा संगणक व प्रिंटरसाठी कर्ज वाटप करण्यात आले आहे. ५० हजार रुपयांचे कर्ज वाटप करताना यात ६ ते ७ हजाराचा जीएसटी कपात केला जातो. मात्र बोगस कोटेशनमुळे तो सरकारच्या तिजोरीत जमा होत नाही. बँकेला याची कल्पना असूनही कर्ज प्रकरणे मंजूर केली जात आहेत.
...
प्रकरण न्यायालयात असताना पदभरती
मनपा कर्मचारी सहकारी बँकेचे संचालक मंडळ काळजीवाहू आहे. भरतीसंदर्भात न्यायालयात प्रकरण गेले आहे. असे असतानाही सीईओ पद भरण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. संचालकांच्या नातेवाईकांची भरती करण्यात आली आहे. मंजूर नकाशा नसताना गृह कर्ज मंजूर करण्यात आले आहे. मुख्य इमारतीच्या बांधकामाचा खर्च आजवर दिला नाही. लाभांश २ ते ४ टक्क्याहून अधिक दिला नाही. ठेवीवर ६ टक्के व्याज तर कर्जावर १२ टक्के व्याज आकारले जाते. तो कमी करण्याची मागणी भागधारक प्रवीण तंत्रपाळे, बाबा श्रीखंडे, संजय मोहरले, बळीराम शेंडे, राहुल अस्वार, भूषण गजभिये, हेमराज शिंदेकर, योगेंद्र बोरकर आदींनी केली आहे.
...