योगेश पांडे/ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 15 - भारतीय जनता पक्षाच्या मुलाखतींचे सत्र शनिवारी संपले व आता प्रतिक्षा अंतिम यादीकडे लागली आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे तब्बल ९ दिवस मुलाखती चालल्या. मात्र अनेकांची मुलाखत केवळ एक औपचारिकताच ठरली. त्यांना नावाव्यतिरिक्त एकाही प्रश्नाची विचारणा करण्यात आली नाही. त्यामुळे आपला तिकीटासाठी विचार होणार की नाही, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. एकूणच एक पल की मुलाखतमुळे संबंधितांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.६ ते १४ जानेवारी या कालावधीत ३ हजार ३ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात प्रस्थापित उमेदवारांसोबतच अनेक नवख्या इच्छुकांचादेखील समावेश होता. मुलाखतींच्या पॅनल मध्ये विद्यमान खासदार, आमदार यांच्यासह माजी आमदार, शहर पदाधिकारी यांचा समावेश होता. प्रत्येक उमेदवाराचा अर्ज व त्याची माहिती मुलाखतकर्त्यांकडे अगोदरपासूनच होती.मुलाखतींदरम्यान साधारणत: उमेदवारांचे व्हिजन नवीन काम करण्याची क्षमता, विविध क्षेत्रांतील जनसंपर्क तसेच प्रभागाच्या विकासाची ब्लू प्रिंट इत्यादींबाबत विचारणा करण्यात येत होती. जर उमेदवार नवीन असेल तर प्रभागाची ओळख, माहिती तेथील समस्या जाणून घेण्यात येत होत्या. पहिल्या दिवशीचा अनुभव ऐकून उमेदवारांनी जय्यत तयारीदेखील केली होती.मात्र काही उमेदवारांना मुलाखतकर्त्यांच्या परीक्षेला सामोरे जाण्याची वेळच आली नाही. मुलाखतीला गेल्यानंतर एकही प्रश्न न विचारता त्यांना पाठविण्यात आले. तर काही लोकांना केवळ नाव विचारुन ख्यालीखुशाली विचारण्यात आली, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.प्रस्थापितांसोबत नवोदितांचादेखील समावेशएकही प्रश्न न विचारण्यात आलेल्या इच्छुकांमध्ये प्रस्थापितांसोबतच नवोदित उमेदवारांचादेखील समावेश आहे. आपले काम पक्षाला व पदाधिकाऱ्यांना माहितीच असल्याने प्रश्न विचारण्याची वेळच आली नाही. आपले काम फत्ते झाले, असा काही प्रस्थापितांचा समज आहे. मात्र आपले काम पक्षाला माहिती नसताना विचारणा झालीच नाही. मग आपले काम पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार कसे व उमेदवारीचा विचार होणार की नाही, असा प्रश्न नवोदितांना सतावतो आहे. लोकमत जवळ अनेकांनी आपल्या भावना बोलूनदेखील दाखविल्या.सर्वांना समान न्याय : कोहळेयासंदर्भात नागपूर शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काही प्रमाणात असे झाले असल्याचे मान्य केले. मुलाखतींना सामोऱ्या जाणाऱ्या अनेक इच्छुकांचे काम मुलाखत पॅनल च्या सदस्यांना चांगल्याने ठावूक होते. त्यामुळे त्यांच्याकडे वेगळी विचारणा करण्याची आवश्यकताच नव्हती. मुलाखतींच्या मॅरेथॉन सत्रात सर्व इच्छुकांना समान न्याय देण्यात आला असून पक्षाने ठरविलेल्या निकषांवर सर्वांची चाचपणी झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
छोटी सी मुलाखतमुळे इच्छुकांमध्ये संभ्रम
By admin | Updated: January 15, 2017 20:56 IST