सरकारचे शिक्षण विभागाला आदेश
आशिष दुबे - नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय बंद होऊ शकतात. कारण राज्य सरकारने विद्यापीठाशी संलग्नित सर्व अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांचे निरीक्षण करण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाला दिले आहे. या निरीक्षणातून नियमांना डावलून सुरू असलेल्या महाविद्यालयांचा भोंगळ कारभार पुढे येणार आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार अनुदानित, विनाअनुदानित व कायम विना अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, एमबीए, लॉ, फार्मसी महाविद्यालयांची तपासणी होणार आहे. या तपासणीसाठी समित्यांचे गठण करण्यात आले आहे. यात शासकीय महाविद्यालयातील शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठाचे सदस्य अथवा पदाधिकार्यांना या तपासणीपासून दूर ठेवण्यात आले आहे. या तपासात समितीने नोंदविलेल्या माहितीला गोपनीय ठेवण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपासाची विस्तृत माहिती विभागीय सहनिदेशकांना देण्यात येणार आहे. सहनिदेशकांकडून संपूर्ण माहिती निदेशक कार्यालयाला जाईल व निदेशक कार्यालय विस्तृत रिपोर्ट राज्य सरकारला सुपूर्द करेल. यासंदर्भात नुकतीच विभागीय सहनिदेशक डॉ. डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वात शासकीय विज्ञान संस्थेत विभागातील सर्व शासकीय महाविद्यालयाच्या शिक्षकांची एक गोपनीय बैठक पार पडली. या बैठकीत सर्व शिक्षकांना सरकारने दिलेल्या आदेशाची माहिती देण्यात आली. शिक्षकांना निरीक्षणाचे प्रारूप देण्यात आले. यात २४ मुद्दे दिले आहेत. निरीक्षणाचे काम २० दिवसात पूर्ण करायचे आहे. यासंदर्भात दिशानिर्देश देण्यात आले आहे. संपूर्ण माहिती अचूक असावी, निरीक्षणात चूक आढळल्यास शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बुधवारपासून हे निरीक्षण सुरू होणार आहे. कसे होईल निरीक्षण १७ मे रोजी झालेल्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यासाठी समितीचे गठण करण्यात आले आहे. सर्व समित्यांना दिलेल्या प्रारूपात २४ मुद्यांचा समावेश आहे. पहिला मुद्दा महाविद्यालयाच्या भौतिक सुविधेच्या संदर्भात आहे. दुसरा महाविद्यालयात शिकविणार्या शिक्षकांची माहिती, शिक्षकेतर कर्मचार्यांशी जुळलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून पुरविण्यात येणार्या सोई सुविधेची माहिती व गुणवत्तेचा स्तर तपासण्यात येणार आहे.