नागपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून दहा नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी परिचारिका शुभांगी रामकुमार भिवगडे (साठवणे) व स्मिता संजयकुमार आंबिलडुके (मासुळकर) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून यावर येत्या २४ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्ती विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. देशभरात गाजलेली ही हृदयद्रावक घटना ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे घडली होती. संबंधित नवजात बालके आयसीयूमध्ये भरती होती. घटनेच्या चौकशीमध्ये या दोघींसह ज्योती बारसागडे या परिचारिकेने सेवेत निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले. परिणामी, त्यांच्याविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. ३ ऑगस्ट रोजी भंडारा सत्र न्यायालयाने बारसागडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला, पण भिवगडे व आंबिलडुके यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परिचारिकांच्या वतीने ॲड. नचिकेत मोहरीर यांनी कामकाज पाहिले.
-----------
अशा आहेत अटी
१) दर रविवारी व बुधवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पोलीस ठाण्यात हजेरी लावावी.
२) प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये.