लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : मनसर-रामटेक-तुमसर मार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. या राेडलगत पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची निर्मिती केली हाेती. राेडचे काम पूर्णत्वास जाण्यापूर्वीच नाल्यांची दैनावस्था झाल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंत्राटदार कंपनीचा मनमानी कारभार सुरू असून, हा निकृष्ट कामाचा नमुना आहे, असा आराेप नागरिकांनी केला आहे.
या राेडच्या कामाचे कंत्राट बारब्रिक नामक कंपनीला दिले आहे. कंपनीने राेडच्या कामासाेबत पावसाचे व सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम केले आहे. काही ठिकाणी या नाल्या झाकल्या असून, काही ठिकाणी उघड्या आहेत. या राेडचे काम संथगतीने सुरू असून, ते पूर्णत्वास जायला आणखी काही महिने लागणार आहेत. मात्र, बांधण्यात आलेल्या नाल्यांची आतापासूनच दुरवस्था व्हायला सुरुवात झाली आहे.
काही ठिकाणी या नाल्यांची झाकणे तुटली आहेत. त्यामुळे हे काम निकृष्ट प्रतिचे करण्यात आले आहे, असा आराेप रामटेक व परिसरातील नागरिकांनी केला आहे. कंपनीने नाल्यांचे काम दुसऱ्या कंत्राटदारामार्फत करवून घेतल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. कंत्राटदाराने नालीचे बांधकाम चांगल्या प्रतिचे करून देण्यासाठी सात हजार रुपये घेतल्याची माहिती गाेपी काेहपरे यांनी दिली. सध्या झाकणे तुटायला सुरुवात झाली असून, भविष्यात नाली खचायला सुरुवात हाेईल. त्यामुळे या निकृष्ट कामाची जबाबदारी काेण स्वीकारणार आणि त्यांची तातडीने दुरुस्ती काेण करणार, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. या गंभीर प्रकाराकडे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आराेप नागरिक करीत आहेत.