लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रकल्पग्रस्तांनी वेकाेलि प्रशासनाविरुद्ध धरणे आंदाेलन सुरू केले हाेते. ‘रास्ता राेकाे’ करून या आंदाेलनाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची वेकाेलि अधिकाऱ्यांनी ग्वाही दिल्याने या धरणे आंदाेलनाची नुकतीच सांगता करण्यात आली.
वेकाेलिच्या गाेंडेगाव खाण व्यवस्थापनाविरुद्ध नरेश बर्वे व सिनू विनयवार यांच्या नेतृत्वात पहिल्यादिवशी रास्ता राेकाे व नंतर बेमुदत धरणे आंदाेलनाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या आंदाेलनाची दखल घेत वेकाेलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मागण्यांवर ताेडगा काढण्यासाठी वेकाेलि अधिकारी व प्रकल्पग्रस्तांची बैठक आयाेजित करण्यात आली आली. या बैठकीत गाेंडेगावच्या पुनर्वसानापासून इतर सर्व मागण्या व समस्यांवर वेकोलिचे महाप्रबंधक गोखले यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्या मागण्या मान्य करण्याची अधिकाऱ्यांनी ग्वाही दिल्याने आठवडाभरापासून सुरू असलेले आंदाेलन मागे घेण्यात आले.
चर्चेत जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, इंटकचे नरेश बर्वे, असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष सीनू विनयवार, पंचायत समिती सभापती मीना कावळे, नदीम जमा, पप्पू जमा, करुणा भोवते, सरपंच सुनीता मेश्राम, बबलू बर्वे, वेकोलिचे महाप्रबंधक डी. एम. गोखले, गोंडेगाव उपक्षेत्रीय प्रबंधक तरुणकुमार त्रिवेदी, कामठी उपक्षेत्रीय प्रबंधक एस. आर. तलनकर सहभागी झाले हाेते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे शनिवारी (दि. १६) या भागाचा दाैरा करून पाहणी करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.