लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. त्या अनुषंगाने शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत प्रशासनात मंथन सुरू आहे. पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाल्यामुळे उद्योजक चिंतेत आहेत. उद्योजकांचे म्हणणे आहे की, पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आल्यास उद्योगांना त्यातून वगळण्यात यावे. असे न झाल्यास अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा थांबतील व बेरोजगारीचे संकट निर्माण होईल.बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल म्हणाले, सध्यातरी लॉकडाऊन करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून कुठलीही माहिती समोर आली नाही. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमुळे उद्योजकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यांचे म्हणणे आहे, कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून लॉकडाऊन हाच पर्याय असला तरी, नागपूर शहरातून बुटीबोरी येथील उद्योगांध्ये काम करण्यासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी व मालकांचे येणे-जाणे प्रभावित होऊ नये. त्यांना पूर्वीप्रमाणेच पास देण्यात यावा. उद्योगांना बंद न करता, सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरवर भर देण्यात यावा. जर लॉकडाऊनमध्ये उद्योगांना बंद करण्याचा आदेश झाल्यास, उद्योजक, कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी म्हणाले, येणाऱ्या दिवसात लॉकडाऊन करण्याबाबत अधिकृत कुठलीही माहिती नाही. असे होऊ नये व उद्योग चालू राहावे यासाठी व्हीआयए प्रशासनाशी चर्चा करेल. चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन्सचे अध्यक्ष मयंक शुल्का म्हणाले, प्रशासन कोरोनाची स्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना उद्योजकांना देत आहे. उद्योजकांकडून आवश्यक सुरक्षात्मक व्यवस्था करण्यात येत आहे. तरीसुद्धा लॉकडाऊन लागला, तर अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे.
लॉकडाऊनच्या चर्चेमुळे उद्योजकांमध्ये चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 21:51 IST
शहरात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. त्या अनुषंगाने शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत प्रशासनात मंथन सुरू आहे. पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाल्यामुळे उद्योजक चिंतेत आहेत.
लॉकडाऊनच्या चर्चेमुळे उद्योजकांमध्ये चिंता
ठळक मुद्दे बंद नको, सशर्त उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी