दोन वर्षांपासून प्रेमसंबंध : शरीरसंबंधानंतर बलात्काराची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ती १६, तर तो १७ वर्षांचा आहे. दोघेही दहावीत शिकतात. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले, अन हे दोघे सैराट झाले. सोमवारी त्यांचे संबंध उघड झाल्यानंतर मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावणारी तक्रार पोलिसांकडे नोंदवली. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही प्रेमकथा चर्चेला आली.
हे दोघे एकाच शाळेत शिकतात. दोन वर्षांपूर्वी त्याने तिला प्रपोज केले. तेव्हा ते आठवीत होते. प्रेम संबंध जुळल्यानंतर ते शाळेला दांडी मारून एकांतवास शोधू लागले. गेल्यावर्षी त्यांचे चांगलेच फावले. लॉकडाऊनमुळे शाळा नव्हतीच. त्यामुळे ते सैराट झाले. दोघे नियमित घराबाहेर पडून झाडा-झुडपाच्या आडोशाला जायचे. वारंवार शरीरसंबंधही प्रस्थापित करायचे. आई-वडील कामाच्या निमित्ताने बाहेर जात असल्यामुळे या दोघांचे काय सुरू आहे, त्याचा थांगपत्ताही कुणाला नव्हता. काही दिवसांपासून मात्र तिच्या वर्तनाचा आईला संशय आला. तिने हिचा मोबाईल तपासला आणि तिला जबर मानसिक धक्का बसला. ते एकमेकांना चॅटिंग सोबत अश्लील चित्रफितही पाठवीत होते. त्यांनी स्वतःचेही तसेच काही फोटो मोबाईलमध्ये तयार करून घेतले होते. ते पाहून आईने तिच्यावर निर्बंध घातले. घराबाहेर पडण्यास तिला मनाई करू लागली. १६ एप्रिलपासून त्यांच्या भेटीगाठीत खंड पडल्याने तो तिला वारंवार फोन करून भेटीसाठी बोलावू लागला. सोमवारी दुपारी ती घराबाहेर जाण्यासाठी जिद्द करत असल्याचे पाहून आईने तिचा क्लास घेतला. तिला पोलिसांच्या कारवाईचा धाक दाखवण्यासाठी हिंगणा पोलीस ठाण्यात नेले. तेथे महिला पोलिसांकडून तिला धाकदपट करावे, असा आईचा हेतू होता. त्यामुळे तिचे वर्तन आईने महिला पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मुलीला पुढ्यात बसवून तिची समजूत घातली. त्यालाही समज देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
---
प्रकरणाला कलाटणी
त्याच्या मोबाईलमध्ये आपले अश्लील फोटो, मेसेज असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. ते डिलीट करण्यासाठी मुलीने तिच्या प्रियकराचा मोबाईल हातात घेतला आणि ती हादरलीच. तो तिच्या सोबतच दुसऱ्या एका मुलीसोबत गुंतून असल्याचेही त्याच्या मोबाईलवरून तिच्या लक्षात आले. त्यामुळे ती बिथरली. तिने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला. तो दोन वर्षांपासून सलग शरीरसंबंध प्रस्थापित करीत असल्याचे पोलिसांना सांगितले.
---
...अन गुन्हा दाखल
प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे हिंगणा पोलिसांनी त्यांना एमआयडीसीत पाठविले. तेथे मुलीने तिच्या नजरेत ''बेवफा'' ठरलेल्या अल्पवयीन प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली. पीएसआय ठाकूर यांनी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
---