लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरुद्ध देशद्रोह (भादंवि कलम १२१) व सैन्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य करणे (भादंवि कलम ५०५) या गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्यासाठी दाखल तक्रार प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधिश बी. डी. तारे यांनी सोमवारी फेटाळून लावली. तक्रारीतील आरोप दखल घेण्यायोग्य नसल्याचे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी ही तक्रार दाखल केली होती. ११ फेब्रुवारी २०१८ रोजी बिहार येथे एका कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय सैन्याची मानहानी झाली असे मून यांचे म्हणणे होते. याविरुद्ध मून यांनी सुरुवातीला १५ फेब्रुवारी रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. परंतु, पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे मून यांनी जेएमएफसी न्यायालयात धाव घेतली होती. भागवत यांनी केलेले वक्तव्य गुन्हा असून त्याची दखल घेणे व भागवत यांच्यावर भादंविच्या कलम १२१ व ५०५ अंतर्गत कारवाई करणे आवश्यक आहे असे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. न्यायालयाने मून यांचे बयान नोंदवून घेतले. त्यानंतर न्यायालयाला त्यांच्या आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे त्यांची तक्रार फेटाळण्यात आली. या निर्णयाविरुद्ध मून वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करणार आहेत. मून यांच्यातर्फे अॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरुद्धची तक्रार खारीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 20:39 IST
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरुद्ध देशद्रोह (भादंवि कलम १२१) व सैन्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य करणे (भादंवि कलम ५०५) या गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्यासाठी दाखल तक्रार प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधिश बी. डी. तारे यांनी सोमवारी फेटाळून लावली.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरुद्धची तक्रार खारीज
ठळक मुद्देआरोप अदखलपात्र ठरले : जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय