लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहा महिन्यात २० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून इबिड फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीचे संचालक आणि नोकरदारांनी एका व्यक्तीचे १२ लाख रुपये हडपले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने निखिल दिलीप वासे (वय ३३, रा. कपिलनगर) यांनी सोमवारी बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
आरोपी सुनील कठियाला, पूजा कठियाला, संतोष कठियाला हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांनी इबिड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाने काही वर्षांपूर्वी कंपनी सुरू केली. श्रद्धानंद पेठेतील (बजाजनगर) सुभाषित अपार्टमेंटमध्ये त्यांनी कंपनीचे कार्यालय थाटले. येथे त्यांनी स्वाती लक्षणे, मुकेश गाैतम, शेखर, आरती रॉय आदींना वेगवेगळ्या पदावर नियुक्त केले. या सातही आरोपींनी आपल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास २० टक्के व्याज देण्याची थाप मारून अनेकांची रक्कम ताब्यात घेतली. निखिल वासे यांनीदेखील त्यांच्याकडे १ नोव्हेंबर २०२० ला १२ लाख रुपये गुंतवले. जून २०२१ ला नियोजित मुदत संपल्यानंतर वासे यांनी रक्कम परत मागितली. आरोपी टाळाटाळ करीत असल्याने त्यांनी तगादा लावला. मात्र, व्याजच काय मूळ रक्कमही आरोपींनी परत केली नाही. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने वासे यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे
---