लोकमत सखी मंच व हार्मोनी इव्हेंट्सचे आयोजन : दर्जेदार गीतसंगीताने रसिक मंत्रमुग्ध नागपूर : पंचमदा अर्थात आर. डी. बर्मन म्हणजे संगीताचे बादशहाच. त्यांचे संगीत म्हणजे जादुई होते. कधी काळजात रुतुन बसणारे तर कधी मस्तीत थिरकायला भाग पाडणारेही. पण पंचमदांच्या गींतांमध्ये जीवनाचा अर्थ होता आणि जगण्याचे तत्त्वज्ञान होते. त्यात गुलजार म्हणजे अनवट शब्दांनी सहजपणे जीवनातल्या अनुभवांना भिडणारे. हा अनुभव आपलाच आहे, इतका जवळचा वाटावा अशा त्यांच्या रचना रसिकांना वेड लावणाऱ्या. पंचमदांचे संगीत आणि गुलजार यांची रचना यांचा मिलाफ झाला आणि चित्रपट संगीताचे सुवर्णयुगच जन्माला आले. थेट हृदयाला हात घालणाऱ्या गीतांनी तब्बल चार पिढ्यांना वेड लावले. पंचम आणि गुलजार स्वरांचा काफिला रंगला तेव्हा रसिक त्यात हरविले. याचा प्रत्यय आज डॉ. देशपांडे सभागृहात आला. लोकमत सखी मंच आणि हार्मोनि इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंचम - गुलजार’ या कार्यक्रमाचे दोन प्रयोग आज डॉ. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले. या दोन्ही प्रयोगांना नागपूरकर रसिकांनी खच्चून गर्दी केली. वन्समोअरची दाद आणि टाळ्यांचा प्रतिसाद देत हा कार्यक्रम रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला. या कार्यक्रमाला स्वर्णिम डेव्हलपर्सचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रमुख अतिथी डॉ. दंदे फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. पिनाक दंदे यांनी दीपप्रज्वलनाने केला. याप्रसंगी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, प्रचिती महिला अर्बन क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष संगीता देशमुख, रेखा उराडे, शैलेश बावने, अश्विनी झिलपे, भूषण बोंडे, प्रेमा बोंडे, म्हाडाचे अभियंता विवेक उमाळकर, हार्मोनी इव्हेंट्सचे राजेश समर्थ, माजी मंत्री रणजित देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. पिनाक दंदे यांनी लोकमतच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे काम लोकमत सातत्याने करीत असल्याबद्दल त्यांनी लोकमतचे अभिनंदन करुन सर्व कलावंतांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची संकल्पना, संयोजन राजेश समर्थ यांचेच होते. यानंतर मात्र पंचम आणि गुलजार या जोडगोळीने अजरामर केलेल्या गीतांचा सिलसिला सारे वातावरण व्यापून उरला. नागपूरचा किशोरकुमार म्हणून रसिकांच्या गळ्यातला ताईत असलेल्या सागर मधुमटकेने ‘मुसाफिर हुं यारो...’ या गीताने कार्यक्रमाला प्रारंभ केला आणि उत्सुकता ताणलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाने हा कार्यक्रम बहरत गेला. यानंतर विविध वाहिन्यांवरील रिअॅलिटी शो जिंकणारी संगीतरत्न पुरस्कारप्राप्त आकांक्षा नगरकर - देशमुख हिने सिली हवा छु गयी...या गीताने समाँ बांधला. तर त्यानंतर शहरातील गुणी गायिका श्रीनिधी घटाटेने ‘आज कल पांव जमी पर नही पडते मेरे...’ या घर चित्रपटातल्या गीताने रसिकांना दाद द्यायला भाग पाडले. चिरंतन देशमुख यांनी ‘कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते यारो..’ या गीताने प्रेक्षकांना जिंकले. सागर मधुमटके, चिरंतन देशमुख, आकांक्षा नगरकर आणि श्रीनिधी घटाटे यांच्या दमदार आणि तयारीच्या सादरीकरणाने तर वाद्यवृंदातील तयारीच्या वादकांच्या साथीने हा कार्यक्रम केवळ अविस्मरणीयच ठरला. यातील गीतांची निवड चोखंदळपणे करण्यात आली होती. याशिवाय गीत सादरीकरण करताना त्या गीताचा आशय, भावना तितक्याच हळुवारपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी याची विशेष काळजी घेण्यात आल्याने इतर कार्यक्रमांच्या तुलनेत हा कार्यक्रम एक वेगळी उंची गाठणारा होता. सागर मधुमटकेने यावेळी ‘तुम आ गये हो नुर आ गया है..., मै हु झुम झुम झुमरु..., आ के सिधी लगी...’ आदी गीतांनी रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले. आकांक्षा नगरकरने ‘बिती ना बिताई रैना..., तुझसे नाराज नही जिंदगी..., इस मोड से जाते है..., मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...’ आदी गीते सादर केलीत. तर सागर आणि आकांक्षा यांनी अनेक युगुल गीतांनीही समां बांधला. याप्रसंगी त्यांनी ‘आप की आँखो मे कुछ महके हुए से ख्वॉब है..., गुलमोहर गर तुम्हारा नाम होगा..., चल बैठे चर्च के पिछे...’ आदी गीतांनी खासी रंगत आणली. श्रीनिधी घटाटेनेही ‘नाम गुम जाएगा..., तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही..., दो नैना इक कहानी थोडासा बादल थोडासा पानी...’ आदी गीतांच्या सादरीकरणाने अनेकदा रसिकांचा वन्समोअर घेतला. चिरंतन देशमुख यांनी ‘फिर वही रात है...’आदी गीतांनी रसिकांचे मनोरंजन केले. याप्रसंगी पंचमदा यांनी संगीतात अनेक प्रयोग केले. काही गीते ऱ्हीदमिक तर काही खोल भावनेच्या तळाचा शोध घेणारी होती. याप्रसंगी श्रीनिधीने ‘मिठे बोल बोले बोले पायलिया...’ हे अनोख्या धाटणीचे तर श्रीनिधी आणि आकांक्षा यांनी ‘पिया बावरी....’ हे गीत तयारीने सादर करुन पंचमदांच्या संगीतातील बारकावे दाखविले. (प्रतिनिधी)रसिकांची खच्चून गर्दीलोकमत सखी मंचच्या या कार्यक्रमासाठी रसिकांनी खच्चून गर्दी केली होती. सभागृहात एकही आसन रिकामे नव्हते. अनेक लोक सभागृहाबाहेर आत जाऊ देण्याची विनंती करीत होते पण जागा नसल्याने त्यांना दुसऱ्या कार्यक्रमासाठी विनंती करण्यात आली. प्रामुख्याने लोकमत सखी मंचच्या सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय यांनी हा कार्यक्रम एन्जॉय केला. अनेकांनी असे कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्याची विनंती केली. वादकांच्या वाद्यसंगतीने रंगलेला कार्यक्रम या कार्यक्रमात बेस गिटारवर रिंकु निखारे, लीड गिटारवर प्रकाश चव्हाण, सिंथेसायझरवर ज्येष्ठ वादक पवन मानवटकर आणि राजा राठोड, बासरीवर अरविंद उपाध्ये, तबल्यावर प्रशांत नागमोते आणि आॅक्टोपॅडवर नंदू होगाणे यांनी साथसंगत केली. पंचमदांच्या गीतांवर वाद्यसंगीत करणे कठीण आहे. पण सर्व वादकांचा परस्परांशी असणारा समन्वय आणि संवाद या कार्यक्रमाची उंची वाढविणारा होता. विशेषत्वाने आजच्या कार्यक्रमात सर्व वादकांसह प्रशांत नागमोते यांनी ‘मिठे बोल बोले ....’ या गीतावरच्या तबला सादरीकरणाने रसिकांच्या टाळ्या घेतल्या. तबल्याचे संतुलन आणि घुमारा यावर असणारे त्यांचे प्रभुत्व रसिकांनाही आनंद देणारे होते. या कार्यक्रमाचे रसाळ निवेदन राजेश समर्थ यांनी केले. ध्वनिव्यवस्था स्वप्निल उके यांची तर व्हीडीओ मनोज पिदळी यांचे होते. चित्रपटगीतातील दृश्याने रंगत चित्रपट गीत सादर होत असताना त्या गीताचे दृश्य दाखविण्यात असल्याने रसिक या कार्यक्रमात अधिक गुंतले. नॉस्टॅल्जिक झाले. स्मरणरंजनाचा हा सोहळा सुरेल स्वरांनी रंगतदार झाला. यानिमित्ताने अनेक रसिक त्यांच्या पूर्वायुष्यातल्या आठवणींशी जुळले.
पंचम-गुलजार शब्दस्वरांचा रंगलेला काफिला
By admin | Updated: February 9, 2015 00:57 IST