CM Devendra Fadnavis Press News: छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि कोल्हापूरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बऱ्याच तपासानंतरही प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. एकीकडे पोलिसांकडून शोध सुरु असताना प्रशांत कोरटकर दुबईला गेल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर आणि गृह विभागावर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. यात संदर्भात खुद्द मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत एका वाक्यात विषय संपवल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहर कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नागपूर हिंसाचारात ज्या लोकांचे नुकसान झाले आहे. काहींच्या गाड्या फुटल्या आहेत. त्या सगळ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. आता जे काही नुकसान झालेले आहे. ते सगळे नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. त्याची सगळी किंमत काढली जाईल. दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत, तर त्यांची संपत्ती विकली जाईल. अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील
या पत्रकार परिषदेत प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याचा दावा करण्यात येत असल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यात असे आहे की, कोणतीही शहानिशा न करता बातम्या चालवल्या जात आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की, तो दुबईला जावो की, अजून कुठेही जावो. पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील.
दरम्यान, ओळख पटवण्याचे काम अजूनही सुरू आहे. जो जो व्यक्ती दंगा करताना, दंगेखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई करण्याची मानसिकता पोलिसांची आहे. याचसोबत सोशल मीडियाची पडताळणी करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा याला चिथावणी देण्यासाठी पोस्ट केल्या. त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवले जाणार आहे. कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकावण्यासाठी मदत केलेली आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.