चार वारांगना सापडल्या : सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाईनागपूर : नॅचरोपॅथी क्लिनिकच्या आड चालणाऱ्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी दुपारी धाड घातली. येथे वेश्याव्यवसाय करताना पोलिसांना चार जणी सापडल्या. मात्र, त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारी मेघना आणि तिचा दलाल (व्यवस्थापक) पळून गेला. रविनगर चौकातील एका इमारतीत भाड्याची सदनिका घेऊन मीनाक्षी ऊर्फ मेघना पंढरी खारकर (वय २८, रा. चंदननगर) हिने शतायू नॅचरोपॅथी क्लिनिक सुरू केले होते. प्रारंभी मसाजच्या नावाखाली येणाऱ्या ग्राहकांना देहविक्रय करणाऱ्या महिला-मुली उपलब्ध करून ती पैसे उकळत होती, नंतर तिने येथे कुंटणखानाच सुरू केला. मेघनासोबत आकाश नामक दलाल हा कुंटणखाना चालवीत होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला त्याची माहिती मिळाली.वरिष्ठ निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचून गुरुवारी दुपारी बनावट ग्राहकाला आधी कुंटणखान्यावर पाठवले आणि त्याच्याकडून संकेत मिळताच तेथे धाड घातली. या कुंटणखान्यावर देहविक्रय करणाऱ्या चार जणी आढळल्या. त्या चौघीही विवाहित असून, पैशाच्या लोभाने वेश्याव्यवसाय करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पोलीस पोहोचणार अशी कुणकुण लागताच मेघना आणि आकाश पळून गेले. अंबाझरी ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, आर्थिक शाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक पी.सी. सोनवणे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक सुनीता पाटील, योगेश चौधरी, हवालदार पांडुरंग निकुरे, योगेश घोडकी, गोपाल वैद्य, सुभाष खेडकर, नायक मनोज चव्हाण, अजय घाटोळ, शिपाई अनिता धुर्वे, छाया राऊत, सीमा बघेले, साधना चौव्हाण, अनिल दुबे, बळीराम रेवतकर आणि सामाजिक कार्यकर्त्या अॅड. रेखा बारहाते यांनी ही कामगिरी बजावली.(प्रतिनिधी)
नॅचरोपॅथी क्लिनिकच्या आड कुंटणखाना
By admin | Updated: April 8, 2016 02:58 IST