नागपूर : मध्य रेल्वेच्या आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने रेल्वे रुळांचा परिसर स्वच्छ केला. तर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वेगाड्यांमधील स्वच्छता, पेंट्रीकारचे निरीक्षण करण्यात आले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्टेशन ॲप्रोच रोड, रेल्वेस्थानकाचा परिसर आणि रेल्वे रुळाच्या आजूबाजूच्या नाल्या, गडरलाईनची सफाई केली. रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या झुडपांची कटाई करून रेल्वे रूळ स्वच्छ राहतील याची काळजी घेतली. यावेळी रेल्वे प्रवाशांना रेल्वेस्थानक परिसर, रेल्वे रुळावर कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले.
........
रेल्वे कोच, पेंट्रीकारची केली पाहणी
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्वच्छ रेल्वेगाडी, स्वच्छ कोच या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेगाड्यांची स्वच्छता, यार्डातील रॅकचे निरीक्षण करून रेल्वेस्थानकाची स्वच्छता, शौचालयांची सफाई आणि स्वच्छतेच्या बाबतीत पेंट्रीकारचे निरीक्षण केले. ३० सप्टेंबरपर्यंत स्वच्छतेच्या बाबतीत विभागात उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
...........