नागपूर : राज्य शिक्षण मंडळाचा शनिवारी असलेला इयत्ता बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा सुरू हाेण्याच्या काही वेळापूर्वी माेबाईलवर व्हायरल झाल्याच्या चर्चेने पुन्हा यंत्रणेच्या दक्षतेवर प्रश्न निर्माण केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील ‘सेक्शन ए’ चे प्रश्न पेपर सुरू हाेण्यापूर्वी माेबाईलवर व्हायरल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील बऱ्याच केंद्राबाहेर यावरून संशयास्पद हालचाली बघायला मिळाल्याची चर्चा आहे. मात्र विभागीय मंडळाने अशाप्रकारे प्रश्नपत्रिका व्हायरल हाेण्याच्या माहितीला स्पष्ट नकार दिला.
शनिवारी सकाळी ११ वाजतापासून पेपर सुरू हाेणार हाेता. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील एका केंद्रावरून सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील काही भाग माेबाईलवर बाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे. हा भाग ‘सेक्शन ए’ मधील पर्यायवाचक प्रश्नांचा हाेता. सेक्शन ए च्या आठ प्रश्नांसाठी १६ गुण आहेत. हाच भाग माेबाईलने व्हायरल करण्यात आल्याचे बाेलले जात आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या उत्तरांचे पर्याय असलेला कागदही माेबाईलवर फिरत हाेता. यासाठी काही केंद्राबाहेर तरुणांच्या संशयास्पद हालचालीही दिसून आल्याची समाेर आले आहे. यामुळे गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा दिवसभर चालली हाेती. मात्र पेपर फुटल्याची शक्यता बाेर्डाच्या अधिकाऱ्यांनी धुडकावून लावले आहे. अशाप्रकारची कुठलीही घटना समाेर आली नसल्याचे बाेर्डाने स्पष्ट केले.
"जिल्हाधिकाऱ्यांपासून पाेलीस आयुक्त, पाेलीस अधिक्षक व सर्व यंत्रणा परीक्षेसाठी अलर्ट माेडवर आहे. मलाही याबाबत फाेन आला हाेता, मात्र त्यांच्याकडे असला कुठलाही पुरावा नव्हता. पुरावा असता तर लगेच सायबर गुन्हे शाखेला कळवून ताबडताेब कारवाई हाेऊ शकली असती, पण तसे काहीच घडलेले नाही. त्यामुळे पेपर व्हायरल झाल्याची माहिती निव्वळ अफवा आहेत."- चिंतामण वंजारी, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर.
शिक्षक, कर्मचाऱ्यांचेही माेबाईल काढापरीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून माेबाईल व इतर इलेक्ट्रानिक्स उपकरणे काढली जातात. त्याचप्रमाणे परीक्षेत केंद्र प्रमुख, निरीक्षक असलेले शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यांनाही माेबाईल नेण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. केंद्रात जाण्यापूर्वीच त्यांचेही माेबाईल का काढण्यात येऊ नये, असे विचारले जात आहे.