जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : १८ लोकांना मिळाले प्रमाणपत्र नागपूर : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या योजनेंतर्गत नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र मिळणे सुरू झाले आहे. २ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत आतापर्यंत ११८ लोकांनी अर्ज केले असून यापैकी १८ लोकांना घरपोच प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे नागरिकही आनंदी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उत्पन्नाचे दाखले, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, शपथपत्र, अधिवास व राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, सिटी सर्व्हे आदींसह विविध कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची ये-जा असते. विद्यार्थ्यांपासून तर पालकांपर्यंत आणि नोकरदारापासून तर शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच कुठल्या ना कुठल्या प्रमाणपत्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावेच लागते. तसेच ते जिल्ह्याचे मुख्यालय सुद्धा आहे. त्यामुळे शहरासोबत संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यावे लागते. परंतु शासकीय काम आणि वर्षभर थांब असाच काहीसा अनुभव नागरिकांना येतो. यातून मार्ग काढण्यासाठी अनेकजण मध्यस्त, दलालांची मदत घेतात, नागरिकांची कामे तातडीने होतातही, परंतु पुढे मात्र अडचणींचाच सामना करावा लागतो. यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी अलीकडे अनेक अभियान सुरू केले आहेत. यात आणखी एक पाऊल टाकत आता घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. सेतू कार्यालयाद्वारे येत्या २ जानेवरीपासून ही सुविधा सुरू झाली आहे. यासाठी त्यांना केवळ १५ रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. आतापर्यंत ११८ लोकांनी या योजनेंतर्गत अर्ज केला असून १८ लोकांना घरपोच प्रमाणपत्र मिळाले आहेत. (प्रतिनिधी)
नागरिकांना घरपोच मिळू लागले प्रमाणपत्र
By admin | Updated: January 8, 2017 02:26 IST