चिमुकलीसह दोघांचा मृत्यू : वाहनचालक पसार नागपूर : भरधाव वाहनांनी धडक दिल्यामुळे एका चिमुकलीसह दोघांचा करुण अंत झाला. सीताबर्डी आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी हे दोन वेगवेगळे अपघात घडले. पोलिसांच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील रहिवासी चंदू घोसाळे गुरुवारी सकाळी ११ वाजता नागपुरात आले होते. मुलींना भूक लागल्यामुळे त्यांनी छोट्या मुलींना हॉटेलसमोर उभे ठेवले आणि ते खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. दोन वर्षांची सलोनी रस्त्यावर खेळत असताना अचानक एका भरधाव वाहन चालकाने तिला धडक मारली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला प्रारंभी लता मंगेशकर हॉस्पिटल आणि नंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सायंकाळी ५.१५ च्या सुमारास डॉक्टरांनी सलोनीला मृत घोषित केले. सेवगना घोसाळे यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पळून गेलेल्या आरोपी वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे. दुसरा अपघात कळमन्यातील गोमती हॉटेलजवळ गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडला. प्रफुल श्रावण देवघरे (वय ३०, रा. लालगंज) हा मोटारसायकलने (एमएच ४९/ टी २०६७) जात असताना त्याला भरधाव ट्रक चालकाने (एचआर ७३/ ८१८०) जोरदार धडक मारली. त्यामुळे प्रफुलचा करुण अंत झाला. याप्रकरणी हिमांशु धनराज देवघरे (वय १८) याने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. (प्रतिनिधी)
सीताबर्डी, कळमन्यात अपघात
By admin | Updated: December 24, 2016 02:47 IST