लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मुंबईत रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी चक्क कडू यांना विश्रामगृहातच रोखून ठेवले. त्यामुळे त्यांचे मुंबईचे विमान हुकले. या प्रकारामुळे कडू काही काळ संतप्त झाले होते. त्यांना अडविण्याचे आदेश कुणी दिले यासंदर्भात विविध चर्चांना उधाण आले होते.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी बच्चू कडू सकाळी ९.१५ च्या विमानाने मुंबईला रवाना होणार होते. सिंचन विभागाच्या विश्रामगृहाबाहेर तैनात पोलिसांनी त्यांना रोखले. यामुळे काही वेळ तणावदेखील निर्माण झाला होता. अखेर दुपारच्या विमानाने जाण्याची त्यांना परवानगी मिळाली. प्रशासनाचा गैरसमज झाला होता अशी माहिती कळाली. मात्र नेमके का थांबविले हे समजले नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले. महाविकासआघाडीतील घटकपक्षांचे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन असतानादेखील कडू यांना अशाप्रकारे का रोखले हा प्रश्न उपस्थित होत आहे.