लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या चितळाला जाेरात धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले असून, वनविभागाने त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली आहे. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील आमडी गावाजवळ शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
बिजेवाडा (ता. रामटेक) येथील प्रयास ठवरे हे त्यांच्या वाहनाने शुक्रवारी रात्री गावाकडे येत हाेते. त्यांना आमडी गावाजवळ रस्त्यावर जखमी अवस्थेतील चितळ आढळून आले. वेदनांमुळे ते तडफडत असल्याने त्यांनी लगेच रामटेक येथील वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांना फाेनवर माहिती दिली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून जखमी चितळाला ताब्यात घेतले आणि वनअधिकाऱ्यांना कळविले. वन धिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने त्या चितळावर उपचार करायला सुरुवात केली.
या परिसरात जंगली भाग असून, तिथे वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्यातील एक चितळ पाणी किंवा खाद्याच्या शाेधात वाट भरकटले आणि राष्ट्रीय महामार्गावर आले. त्यातच भरधाव अज्ञात वाहनाने त्याला जाेरात धडक दिली आणि वाहन निघून गेले. या महामार्गावर वन्यप्राण्यांना अपघातांमध्ये नेहमीच जखमी व्हावे लागते. प्रसंगी प्राणही गमवावे लागतात. वनविभागाने यावर याेग्य उपाययाेजना करावी, अशी मागणी रामटेक तालुक्यातील वन्यजीवप्रेमींनी केली आहे.