धामणा : दीड वर्षीय चिमुकली खेळत असताना घरासमाेर उभ्या असलेल्या ट्रकखाली गेली. त्यातच चालकाने ट्रक सुरू करून पुढे नेताच तिच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. उपचाराला नेताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील धामणा (लिंगा) येथे गुरुवारी (दि. १०) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
रुचिका सुनील खंडाते, असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ती घराशेजारील अशाेक गायकवाड, रा. धामणा (लिंगा) यांच्या घरासमाेरील राेडवर खेळत हाेती. खेळताना ती कुणाचेही लक्ष नसताना राेडवर उभ्या असलेल्या एमएच-४०/जेयू-८०५७ क्रमांकाच्या ट्रकखाली गेली. त्यातच ट्रकचालक सुनील धुर्वे (३८, धामणा लिंगा, ता. हिंगणा) याचे ट्रक सुरू करून पुढे नेला. त्यामुळे ट्रकच्या खालचा लाेखंडी भाग डाेक्याला लागल्याने तिला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी तिला लगेच दवाखान्यात नेले. मात्र, डाॅक्टरांनी तपासणीत तिला मृत घाेषित केले. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी अनिल भीमराव खंडाते यांच्या तक्रारीरून ट्रकचालक सुनील धुर्वे याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा तपास हेडकाॅन्स्टेबल कमलाकर उईके करीत आहेत.