लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : लाॅनमध्ये बहिणींसाेबत खेळताना पाचवर्षीय बालक अनावधानाने ट्रॅक्टरला जाेडलेल्या राेलरखाली आला आणि त्यातच चिरडून त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उबाळी येथे साेमवारी (दि. २६) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
श्रीकांत गुलाब नागपुरे (५, रा. उबाळी, ता. कळमेश्वर) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. तो एकुलता एक मुलगा असून, त्याला दाेन बहिणी आहेत. महेंद्र कारभारी यांची उबाळी येथे नर्सरी व लाॅन आहे. श्रीकांतची आई माधुरी त्या नर्सरीमध्ये कामाला गेली हाेती. काेराेना महामारीमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे ती श्रीकांत, मानसी व यशस्वी या तिन्ही मुलांना साेबत घेऊन कामावर जायची. आई दिवसभर काम करायची तर ही भावंडे दिवसभर त्या नर्सरी व लाॅनमध्ये खेळायची.
त्या लाॅनमधील गवत ट्रॅक्टरला जाेडलेल्या राेलरने दाबण्याचे काम सुरू हाेते. माधुरीजवळच प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये माती भरण्याचे काम करीत हाेती. श्रीकांत त्याच्या दाेन्ही बहिणींसाेबत त्या लाॅनवर खेळत हाेता. खेळताना अनावधानाने राेलरखाली आला आणि गंभीर जखमी झाला. माधुरीने लगेच या घटनेची माहिती पती गुलाब यांना दिली. त्यांनी श्रीकांतला लगेच कळमेश्वर येथील ग्रामीण रुणालयात आणले. तिथे उपचाराला सुरुवात करताच त्याचा मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा गेल्याने आईने हंबरडा फाेडला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त हाेत हाेती. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.
...
तालुक्यातील दुसरी घटना
लाॅनमधील राेलरखाली दबून मृत्यू हाेण्याची ही कळमेश्वर तालुक्यातील दुसरी घटना हाेय. घाेराड येथील लाॅनचे राेलरच्या मदतीने सपाटीकरण सुरू असताना २ मार्च २०२१ राेजी ज्ञानेश्वर माधवराव कडू (५४, रा. घाेराड, ता. कळमेश्वर) यांचा मृत्यू झाला. या घटनेत राेलरला बैलजाेडी जुंपली हाेती तर ज्ञानेश्वर बैलजाेडी हाकलत हाेते. आवाजाने बैल घाबरले आणि ताेल गेल्याने ज्ञानेश्वर राेलरखाली आले हाेते.