गंभीर रुग्ण धोक्याबाहेर : इतर १६ जणांना दोन-तीन दिवसात सुटी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गडचिरोलीतील भामरागड येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात जखमी झालेल्या जवानांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपुरातील ‘क्युअर इट हॉस्पिटल’मध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्, विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान शरद शेलार, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे तसेच पोलीस उपायुक्त रवींद्रसिंह परदेशी उपस्थित होते. बुधवारी ‘सी-६०’ कमांडोंचे पथक गस्तीवर असतानाच नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या मदतीने त्यांची बुलेटप्रूफ गाडी उडवली. ही गाडी २० ते २५ फूट उंच उडून जवानांच्या अंगावर पडल्याने ३९ जवान जखमी झाले. यातील १८ जखमी जवानांना नागपुरातील ‘क्युअर इट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले. यातील चार जवानांवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील दीपक भांडवलकर यांचे मूत्राशय फाटल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हॉस्पिटलला भेट देत जखमी जवानांची आस्थेने चौकशी केली. सोबतच जवानांवर सुरू असलेल्या औषधोपचाराची माहिती डॉक्टरांकडून जाणूनही घेतली. ‘क्युअर इट हॉस्पिटल’चे संचालक डॉ. रोशन भिवापूरकर व हॉस्पिटलच्या सेंटर हेड अमृता सूचक यांनी जवानांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले, गुरुवारी एकूण १८ जखमी जवानांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. यातील दीपक भांडवलकर यांची प्रकृती गंभीर होती, परंतु तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते धोक्याबाहेर आहेत. शुक्रवारी त्यांचे डायलिसीस करण्यात आले. शिवाय इतर रुग्णांना येत्या दोन-तीन दिवसात रुग्णालयातून सुटी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आणखी चार जवान भरती जखमी झालेल्या आणखी चार जवानांना ‘आॅरेंज सिटी हॉस्पिटल’मध्ये भरती करण्यात आले. विजय सिंग ठाकूर (२५), गिरीधर तुलावी (२३), सतीश महाका (३१) व मनोहरराव महाका (४१) अशी जखमी जवानांची नावे आहेत. यातील दोन जवानांच्या छातीला जबर मार बसला असून हातपायही फ्रॅक्चर झाले आहेत. सध्या या चौघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले. शुक्रवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. आशिष देशमुख यांनी हॉस्पिटलला भेट देऊन जवानांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी त्यांच्या सोबत रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मरार उपस्थित होते.
जखमी जवानांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
By admin | Updated: May 6, 2017 02:41 IST