४०० पेक्षा जास्त बेरोजगारांना फटका : तरुणीसह तिघे गजाआडनागपूर : नोकरीचे आमिष दाखवून ४०० पेक्षा जास्त बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या एका तरुणीसह तिघांना शनिवारी धंतोली पोलिसांनी अटक केली. सुश्मिता पी. ब्रम्हा (गोंदिया), अनुप बलकी (साई विहार, पिंपळा) आणि सुमीत निले ऊर्फ अक्षय बडगावकर (अयोध्यानगर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी छत्रपती चौकाजवळच्या एका इमारतीत हब सोलुशन नामक कंपनी थाटली. आॅनलाईन जाहिरात करून ते बेरोजगारांना नोकरी देण्याचे आमिष दाखवत होते. त्यांच्याकडे संपर्क करणाऱ्या प्रत्येकाकडून रजिस्ट्रेशनच्या नावाखाली ते प्रारंभी एक हजार रुपये घ्यायचे. त्यानंतर त्यांना विविध कंपन्या आणि प्रतिष्ठानांमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत होते. त्यांनी अशा प्रकारे ४०० पेक्षा जास्त बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवले. अवघ्या एक हजाराच्या रजिस्ट्रेशननंतर नोकरी मिळत असल्याचे सांगितले जात असल्यामुळे नोकरीचे स्वप्न रंगवणाऱ्या तरुणांची १९ आॅगस्टपासून हब सोलुशन कंपनीच्या कार्यालयात वर्दळ वाढली. तगादा लावणाऱ्या काही जणांना आरोपींनी आॅफर लेटरही दिले. प्रत्यक्षात नोकरी मात्र मिळाली नाही.संतप्त जमाव ठाण्यात नागपूर : बनवाबनवी होत असल्याचे लक्षात आल्यामुळे शनिवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर बेरोजगार हब सोलुशनच्या कार्यालयासमोर जमले. आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे काही तरुणांनी ‘आवाज वाढवला’. त्यामुळे कार्यालयासमोर तणाव निर्माण झाला. त्यानंतर संतप्त जमाव धंतोली ठाण्यात पोहचला. बेरोजगारांच्या भावना लक्षात घेता ठाणेदार राजेंद्र माने यांनी लगेच पोलीस ताफा पाठवून सुश्मिता, अनुप आणि सुमीत ऊर्फ अक्षयला ठाण्यात आणले. येथे त्यांनी पोलिसांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी फसवणुकीची कबुली दिली. शंखपाल सुखदास चौधरी यांच्या तक्रारीवरून पीएसआय के.डी. पवार यांनी आरोपींविरुध्द कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. रविवारी त्यांना कोर्टात हजर करून पीसीआरची मागणी केली जाणार आहे.(प्रतिनिधी)
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By admin | Updated: October 11, 2015 02:58 IST