नागपूर : डिप्टी सिग्नल-शांतीनगर अंडरब्रिज हा अतिशय अरुंद रस्त्यावर होणार आहे. यासंदर्भात नागरिकांनी आक्षेप घेतले असून याचा आराखडा बदलण्याची मागणी समोर येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह आ.कृष्णा खोपडे यांनी तेथील पाहणी केली. संबंधित आराखडा बदलण्याची आवश्यकता असल्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत डिप्टी सिग्नल-शांतीनगर अंडरब्रिजला मान्यता देण्यात आली. मात्र आराखडा तयार करत असताना स्थानिकांना विश्वासात घेण्यात आले नाही. आराखड्यानुसार डिप्टी सिग्नल परिसरातील पन्नासहून अधिक घरे बाधित होत आहे. त्यामुळे हा अंडरब्रिज मोकळ्या जागेतून जायला हवा अशी नागरिकांची मागणी आहे. नवीन जागेचा विकल्प शोधणे व आराखड्यातील बदल यासाठी रेल्वे विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, म.न.पा., ना.सु.प्र. व जनप्रतिनिधी यांचेसोबत संयुक्त बैठक लवकरच घ्यावी, यासाठी प्रशासनाला पत्र दिले असल्याची माहिती खोपडे यांनी दिली. यावेळी नगरसेवक प्रदीप पोहाणे, सरिता कावरे, अनिल गेंडरे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता अतुल गोटे, सेतराम सेलोकर, अजित कौशल, भारत सारवा, लोकेश बावनकर, संजय महामल्ला, दिनेश गंगबोईर, आनंद शाहू, शैलेश नेताम, गोविंदा काटेकर, अनिल कोडापे, कमलेश शाहू, रामसत साहू, अनिकेत ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.