समृद्धी महामार्ग : हायकोर्टात याचिका नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाला बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने शेतकऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्य शासन व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यांमध्ये सदानंद वाघमारे व अन्य शेतकऱ्यांचा समावेश आहे. याचिकेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, अमरावती विभागीय आयुक्त, बुलडाणा जिल्हाधिकारी व महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाला प्रतिवादी करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाकरिता किनगाव राजा, हिवरखेड पूर्णा व राहेरी खुर्द या गावांतील जमीन संपादित केली आहे. कायद्यानुसार येथील जमीन संपादित करण्यासाठी ग्राम पंचायतीची परवानगी आवश्यक आहे. शासनाने या तरतुदीचे उल्लंघन करून भूसंपादनाची अधिसूचना जारी केली. तसेच, नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदलाही देऊ केला नाही. त्यामुळे या प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, आक्षेपांवर सुनावणी घेण्यात यावी व नवीन कायद्यानुसार मोबदला मिळावा, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. विक्रम उंदरे, अॅड. विक्रांत मापारी, अॅड. मिलिंद काकडे व अॅड. विश्वेश्वर पठाडे यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)
भूसंपादनास शेतकऱ्यांचे आव्हान
By admin | Updated: March 31, 2017 03:01 IST