प्र-कुलगुरू चांदेकर : सोमवारी स्वीकारला कार्यभारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नवनियुक्त प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला. विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परीक्षा प्रणालीला मार्गावर आणण्याचेच पहिले उद्दिष्ट असेल, असे मत चांदेकर यांनी यावेळी व्यक्त केले.राज्यपाल कार्यालयाने डॉ. चांदेकर यांची मागील आठवड्यात प्र-कुलगुरूपदी निवड केली. परंतु ते शहराबाहेर असल्याने त्यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला. यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे व कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे हे प्रामुख्याने उपस्थित होेते. विद्यापीठासमोर आजच्या तारखेत अनेक समस्या आहेत. विशेषत: परीक्षा विभागात तर कर्मचाऱ्यांची कमतरता अन् मूल्यांकनाच्या मुद्यावरून बराच ताण आहे. त्यामुळे परीक्षा विभागाची घडी सुरळीत करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न असेल, असे डॉ. चांदेकर म्हणाले. नुकताच कार्यभार स्वीकारला असल्यामुळे इतर मुद्यांचा सखोल अभ्यास करून कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल, असेदेखील ते म्हणाले. डॉ. चांदेकर वर्धमाननगर येथील व्हीएमव्ही महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत; तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेटरवरही ते कुलपतींचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त आहेत. ते नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अभ्यास मंडळावर आहेत. नागपूरच्या जी. एस. महाविद्यालयात ते १३ वर्षे प्राध्यापक होते. (प्रतिनिधी)
परीक्षा विभागाची घडी सुरळीत करण्याचे आव्हान
By admin | Updated: November 18, 2014 00:52 IST