विदर्भ राज्य आंदोलन समिती : विदर्भात ८५ ठिकाणी ‘रास्ता रोको’, कार्यकर्त्यांना अटक व सुटका नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे बुधवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भभर ८५ पेक्षा जास्त ठिकाणी ‘रास्ता-रोको’ आंदोलन करीत चक्का जाम करण्यात आला. दरम्यान नागपूर शहरातील गणेशपेठ बस स्टँडसमोर मुख्य संयोजक राम नेवले यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना अटक करून सुटका केली. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी केली तरीदेखील शासन ऐकण्याच्या तयारीत नाही. सत्तेत येण्यापूर्वी आम्ही सत्तेत आल्यास वेगळा विदर्भ देऊ, असे आश्वासन दिले. आता मात्र, वेगळा विदर्भ न देता विदर्भाचा विकास करण्याच्या गोष्टी सत्ताधारी बोलत आहेत. आतापर्यंत शांततेने आंदोलन करून देखील शासनाने ऐकले नसल्याचा आरोप करत आज विदर्भवाद्यांनी चक्का जाम आंदोलन केले. विदर्भवाद्यांच्या आजच्या आंदोलनाचे स्वरूप तीव्र होते. गणेशपेठ परिसरात एसटी बसेस त्यांनी रोखून धरल्या. विदर्भवाद्यांच्या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक थोड्या कालवधीसाठी खोळंबली होती. विदर्भात ८५ ठिकाणी याप्रकारचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली व काही वेळानंतर सोडून दिले. नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर, काटोल, नरखेड, सिंदी (उमरी), सोनोली, पाटणसावंगी, बुटीबोरी, मौदा (हायवे), कामठी, कन्हान, भिवापूर, उमरेड, रामटेक, कुही यासह विदर्भात ८५ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, अॅड. नंदा पराते, दिलीप नरवाडिया, अरविंद देशमुख, अरुण केदार, श्याम वाघ, विष्णु आष्टीकर, अनिल तिडके, दिलीप कोहळे, हरिभाऊ दादुरिया, वीरेंद्र हटवार, दिनेश पाल, मंगेश मेश्राम, निखील भुते, अश्वजित पाटील, कृष्णराव दाभोळकर, नरेंद्र पलांदूरकर, नेहा पलांदूरकर, वसंत चौरसिया, भगवानदास राठी, मुन्ना महाजन, शकुंतला वट्टीघरे, अनिता हेडाऊ, मंजू पराते, रेखा पराते, मंदा शेंडे, कल्पना अड्याळकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.(प्रतिनिधी) तासभर बसेस खोळंबल्या गणेशपेठ येथील एस.टी, स्टॅण्डजवळ निदर्शने करीत आंदोलकांनी रास्ता रोको केला. अध्यापक भवनापासून घोषणा देत हातात झ्ोंडे बॅन घेऊन कार्यकर्ते एसटी स्टँण्डच्या गेटवरच ठाण मांडून बसले. त्यामुळे तब्बल तासभर बसेस बाहेर निघू शकल्या नाहीत. काही कार्यकर्ते बसवरही चढले होते. तासभर वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांनी व्हॅनमध्ये कोंबले. शंभरावर कार्यकर्त्यांनी अटक करण्यात आली. दोन तासानंतर गणेशपेठ पोलिसांनी कार्यकर्त्यांना सोडले. विविध संघटनांचेही समर्थन रास्ता रोको आंदोलनामध्ये महाविदर्भ जनजागरण, विदर्भ राज्य आघाड़ी, विदर्भ सेना, विदर्भ राज्य संघर्ष समिति आणि विदर्भ फ्रीडम आदी संघटनांचेही समर्थन होते.
स्वतंत्र राज्यासाठी ‘चक्का जाम’
By admin | Updated: January 12, 2017 01:41 IST