नागपूर : राज्यात दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घ्यावी, यासाठी विद्यार्थी सकारात्मक आहेत. शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शक्यच नसल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय योग्य राहील, असा दुजोरा शिक्षकांनीही दिला आहे.
कोरोना साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दहावीचा निकाल कसा जाहीर करायचा, अकरावीचे प्रवेश कसे करायचे, आदी प्रश्न शिक्षक, विद्यार्थी पालकांना पडले होते. शिक्षण विभागाने सीईटीच्या परीक्षेसंदर्भात ऑनलाईन सर्वेक्षण सुरू केले. या सर्वेक्षणात जे विद्यार्थी सहभागी झाले त्यातील ७५ टक्के विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी सकारात्मकता दर्शविली आहे.
दहावीची परीक्षा रद्द झाल्याने अकरावी प्रवेशाचा मार्ग खडतर होता. यावर तोडगा म्हणून तज्ज्ञ समितीने प्रवेश परीक्षेचा पर्याय समोर ठेवला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या बाबतीत सर्वेक्षणही केले आहे. विद्यार्थ्यांनी त्यासाठी आता सकारात्मकता दर्शविली आहे. पण प्रश्न आहे की कोरोना महामारीच्या काळात परीक्षेचे आयोजन कसे होईल, सीईटी किती गुणांची राहील आणि कुठले विषय आणि किती अभ्यासक्रमाचा त्यात समावेश राहील. सर्वेक्षणाचा निकाल पॉझिटिव्ह असल्यामुळे शिक्षण विभाग सीईटीबाबत शिक्कामोर्तब करेल असे दिसून येतेय. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही.
- दहावीची परीक्षाच झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शक्य नाही. त्यामुळे अकरावीत प्रवेश देण्यासाठी कुठलाही आधार नाही. त्यामुळे सीईटी योग्य आहे. पण सर्वच विषयांचा त्यात समावेश करावा.
डॉ. अशोक गव्हाणकर, प्राचार्य
- मुलांचे मूल्यांकन झाले पाहिजे. त्यामुळे सीईटीचा पर्याय योग्य आहे. दुसरा पुन्हा एक पर्याय त्यांच्यापुढे आहे. नवीन शिक्षण धोरणात बारावीलाच महत्त्व दिले आहे. त्यामुळे जी मुले दहावीत ज्या शाळेत होते, त्याच शाळेत राहतील. शाळांना अकरावीच्या तुकड्या देऊन टाकाव्यात. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचाही प्रश्न संपेल.
रवींद्र फडणवीस, अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ
- शिक्षण विभागाने केलेले सर्वेक्षण हे ऑनलाईन आहे. यात ७० टक्के विद्यार्थी आपले मत नोंदवू शकले नाही. मुळात सीईटीची परीक्षा ही अकरावीच्या प्रवेशासंदर्भात आहे. पण पॉलिटेक्निकचे प्रवेश, आयटीआयचे प्रवेश याचाही पर्याय शोधणे महत्त्वाचे आहे. सीईटी घेणे म्हणजे पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेणे होय. महामारीच्या काळात पुन्हा आयोजन करताना अडचणी येऊ शकतात.
अनिल शिवणकर, भाजप शिक्षक आघाडी
- शिक्षण विभागाने जे सर्वेक्षण केले आहे. त्यात २५ ते ३० टक्के विद्यार्थ्यांनी सकारात्मकता दर्शविली नाही. पण ३० टक्के मुलांना परीक्षा नकोच असते. त्यामुळे शासनाने त्यांचा विचार न करता, थेट परीक्षा घ्यावी.
राजश्री उखरे, प्राचार्य