बार कौन्सिल निवडणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:22 AM2018-03-28T01:22:46+5:302018-03-28T01:22:46+5:30
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक होणार असून, त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. परिसरातील अनधिकृत हालचाली रेकॉर्ड करून संबंधितावर आवश्यक कारवाई करता यावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक होणार असून, त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. परिसरातील अनधिकृत हालचाली रेकॉर्ड करून संबंधितावर आवश्यक कारवाई करता यावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदात्यांना मतदान कक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडील मोबाईल निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करावा लागणार आहे.
यावेळची निवडणूक विविध कारणांनी वादग्रस्त ठरत असल्यामुळे कौन्सिल प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत सावधान आहे. निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी न्यायालय कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापूर्वी विधिज्ञ संघटनांच्या सदस्यांकडे ही जबाबदारी राहात होती. परंतु, वाद टाळण्यासाठी त्यांना निवडणूक व्यवस्थेपासून लांब ठेवण्यात आले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र व गोवा येथील तब्बल १६४ उमेदवार रिंगणात असून त्यात नागपुरातील अॅड. किशोर लांबट, अॅड. अनिल गोवारदीपे, अॅड. आसिफ कुरैशी, अॅड. विकास सिरपूरकर, अॅड. ईश्वर चर्लेवार, अॅड. सुदीप जयस्वाल, अॅड. सुनील लाचरवार, अॅड. परिजात पांडे व अॅड. अनुपकुमार परिहार या नऊ उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीत महाराष्ट्र व गोवातील नोंदणीकृत वकिलांना मतदान करता येणार आहे. नागपुरात ५,७०० नोंदणीकृत वकील असून त्यापैकी ४,९०० वकील जिल्हा विधिज्ञ संघटना तर, ८०० वकील उच्च न्यायालय विधिज्ञ संघटनेचे सदस्य आहेत. उमेदवारांनी मंगळवारी जोरदार प्रचार केला. प्रचाराचा अंतिम दिवस असल्यामुळे कुणीही वेळ व्यर्थ घालवला नाही. कौन्सिलच्या गेल्या सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी-२०१५ मध्येच संपला. परंतु, विविध कारणे व राजकीय डावपेचांमुळे ही निवडणूक आतापर्यंत लांबली.
जिल्ह्यात सात न्यायालयांमध्ये मतदान केंद्रे
जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, कामठी दिवाणी न्यायालय, काटोल दिवाणी न्यायालय, रामटेक दिवाणी न्यायालय, सावनेर दिवाणी न्यायालय व उमरेड दिवाणी न्यायालय या सात ठिकाणी मतदान केंद्रे राहणार आहेत.
तक्रारी निराकरणासाठी समिती स्थापन
निवडणुकीशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी निरीक्षण समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात अॅड. श्यामसुंदर दांगट (9820976350), अॅड. सचिन देशमुख (9822610504), प्रवीण रणपिसे (9833695302) व अॅड. पंकज वेर्णेकर (9765629676) यांचा समावेश आहे.
कुणाचीही गय केली जाणार नाही
निवडणुकीमध्ये अनधिकृत कृती करणारा कुणीही असो, त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा निरीक्षण समितीचे सदस्य अॅड. श्यामसुंदर दांगट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. निवडणुकीशी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारींची वेळीच योग्य दखल घेतल्या जाईल, अशी ग्वाहीदेखील दांगट यांनी दिली.
मतदानाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत
मतदानाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे. एका मतदाराने किमान पाच उमेदवारांना एकाच पद्धतीने व सलग पसंतीक्रमाने मतदान करणे आवश्यक आहे. यात चूक झाल्यास मतपत्रिका अवैध ठरविली जाईल.
मतपत्रिकेचे छायाचित्र काढणे अशक्य
काही उमेदवार मतदार वकिलांना, त्यांनी आपल्यालाच मतदान केले हे जाणून घेण्यासाठी, मोबाईलने मतपत्रिकेचे छायाचित्र काढण्यास सांगत असल्याची चर्चा विधी वर्तुळात पसरली आहे. परंतु, कौन्सिलने मतदान कक्षात मोबाईल नेण्यास मनाई केली असल्यामुळे मतपत्रिकेचे छायाचित्र कसे काढले जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.