लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : पाेलिसांनी गस्तीदरम्यान सिंगाेरीफाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. यातील ११ पैकी नऊ गुरांची सुटका करण्यात आली असून, दाेन गुरांचा मृत्यू झाल्याने त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण ७ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार अरुण त्रिपाठी यांनी दिली. ही कारवाई रविवारी (दि. १८) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
कन्हान (ता. पारशिवनी) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना सिंगाेरी परिसरातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी सिंगाेरीफाटा येथे नाकाबंदी केली हाेती. मात्र, पुढे पाेलीस असल्याचे लक्षात येताच एमएच-२७/बीएक्स-३४५७ क्रमांकाच्या वाहनचालकाने ते वाहन अलीकडेच थांबविले आणि वाहन साेडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. ही बाब लक्षात येताच पाेलिसांनी त्या वाहनाची झडती घेतली. त्यांना त्या वाहनात ११ जनावरे काेंबली असल्याचे तसेच त्यातील दाेन जनावरांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी नऊ जनावरांची सुटका करीत त्यांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. शिवाय, मृत जनावरांचा पंचनामा करून वेळीच विल्हेवाट लावली.
ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच सर्व जनावरे कत्तलखान्यात नेले जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी जनावरांसह वाहन जप्त केले. या कारवाईमध्ये सहा लाख रुपयांचे वाहन आणि एक लाख ६५ हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण सात लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार अरुण त्रिपाठी यांनी दिली. शिवाय, आराेपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस नाईक राहुल रंगारी, कुणाल पारधी, संजय बराेदिया, सुधीर चव्हाण, शरद गीते यांच्या पथकाने केली.