लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : पाेलिसांच्या पथकाने घाटराेहणा (ता. पारशिवनी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहलूक करणारा ट्रॅक्टर पकडला. यात चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ट्रॅक्टर व रेती असा एकूण सहा लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. ११) सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
राजेश नवरंग सिंग (३४, रा. मढीबाबा खाण क्रमांक-३, कन्हान, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. कन्हान पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना घाटराेहणा शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी जुनी कामठी राेडवर नाकाबंदी केली. त्यात त्यांनी एमएच-३१/एजी-६१८९ क्रमांकाचा ट्रॅक्टर थांबवून झडती घेतली. त्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमध्ये (क्रमांक-एमएच-३१/झेड-३९५६) रेती असल्याचे निदर्शनास येताच कागदपत्रांची तपासणी केली.
चाैकशीअंती ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी चालक राजेश सिंग यास अटक केली व पळून गेलेल्या बबलू यादव, रा. कन्हान याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला. शिवाय, त्याच्याकडून सहा लाख रुपयाचा ट्रॅक्टर व चार हजार रुपयाची एक ब्रास रेती असा एकूण सहा लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख, कुणाल पारधी, शरद गीते, मुकेश वाघाडे, सुधीर चव्हाण, संजू बदोरिया, निशा शेख यांच्या पथकाने केली.