लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पाेलिसांनी त्यांच्या हद्दीतील चाचेर (ता. माैदा) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले. यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून रेती व ट्रॅक्टर असा एकूण १२ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
रामटेक पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना चाचेर (ता. माैदा) शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या भागाची पाहणी केली. त्यांना येथील नागमंदिर परिसरात एमएच-४०/बीई-४३०३ (ट्राॅली क्रमांक एमएच-४०/बीई-७५२८), एमएच-४०/एएम-१०७६ व विना क्रमांकाचे ट्रॅक्टर येताना दिसले. पाेलिसांनी या तिन्ही ट्रॅक्टरची झडती घेतली असता, त्यांच्या ट्राॅलीमध्ये रेती असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी तिन्ही ट्रॅक्टर व त्यातील रेती जप्त केली. ही रेती माैदा तालुक्यातील सांड नदीच्या पात्रातून आणली असल्याचे ट्रॅक्टरचालकांनी पाेलिसांना सांगितले.
या प्रकरणात सुनील रामनाथ शेंडे (२३), अंकुश हिरामण साखरवाडे (३२) व अनिकेत याेगराज गरपडे (२२) तिघेही रा. चाचेर, ता. माैदा यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला. त्यांच्याकडून १२ लाख ७५ हजार रुपये किमतीचे तीन ट्रॅक्टर आणि सहा हजार रुपयाची तीन ब्रास रेती असा एकूण १२ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस नायक नीलेश बिजवाड करीत आहेत.