लाेकमत न्यूज नेटवर्क
पवनी (रामटेक) : देवलापार पाेलिसांनी नवेगाव चिचदा शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला. कारवाईदरम्यान आराेपी ट्रॅक्टरचालक पसार झाला. या कारवाईत दीड ब्रास रेतीसह ट्रॅक्टर व ट्राॅली असा एकूण ३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि.२६) मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.
देवलापार पाेलीस पथक गस्तीवर असताना नवेगाव चिचदा नाला शिवारातून ट्रॅक्टर जाताना आढळून आले. पाेलिसांना संशय आल्याने ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने ट्रॅक्टर साेडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. सदर एमएच-४०/ए-२७६० क्रमांकाचा ट्रॅक्टर व विना क्रमांकाच्या ट्राॅलीची तपासणी केली असता, त्यात दीड ब्रास रेती आढळून आली. ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी तीन लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर-ट्राॅली व १० हजार रुपये किमतीची रेती असा एकूण ३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी आराेपी ट्रॅक्टरचालक व मालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांच्या मार्गदर्शनात महिला पाेलीस उपनिरीक्षक लक्ष्मी घाेडके, पाेलीस शिपाई रमेश खरकटे, गजानन जाधव, चालक गजानन कविराज यांच्या पथकाने केली.