नागपूर : सज्ज्यावर चढलेल्या मांजरीने एकावर एक ठेवलेल्या गुंडावर उडी मारली. त्यामुळे वरचा गुंड खाली खेळणाऱ्या चिमुकलीच्या डोक्यावर पडला. परिणामी जबर जखमी झालेल्या सहा महिन्याच्या चिमुकलीचा करुण अंत झाला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हजारीपहाड मध्ये सोमवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. लावण्या प्रदीप कुढे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तिचे वडील सैनी ट्रॅव्हल्समध्ये काम करतात. तर, आई गृहिणी आहे. सोमवारी सकाळी ९च्या सुमारास आई स्वयंपाक करीत होती. तर, चिमुकली लावण्या खाली होती. तेवढ्यात घरात मांजर शिरली. तिने सज्ज्यावर उडी मारली. तेथे एकावर एक असे दोन गुंड ठेवले होते. मांजरीच्या उडी मारण्याने एक गुंड चिमुकल्या लावण्याच्या डोक्यावर पडला त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिचे रडणे ऐकून आईने घरात धाव घेतली. जखमी लावण्याला मेडिकलमध्ये नेण्यात आले. डोक्यात रक्ताची गाठ पकडल्यामुळे चिमुकल्या लावण्याला दुपारी ३ च्या सुमारास डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पीएसआय तसरे पुढील तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)
मांजरीने घेतला बळी!
By admin | Updated: March 24, 2015 02:13 IST