लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : तालुक्यातील गुमथळा व वडोदा जिल्हा परिषद सर्कल आणि महालगाव, बिडगाव पंचायत समिती गणाच्या पाेटनिवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, प्रहारच्या उमेदवारांनी साेमवारी (दि. ५) शक्तिप्रदर्शन करून जिल्हा परिषद व पंचायत समिती पाेटनिवडणुकीत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. तालुक्यात महाआघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.
गुमथळा जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून, येथे भाजपने विद्यमान सदस्य जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान यांना उमेदवारी नाकारली आहे. यामुळे या सर्कलमधून भाजपचे योगेश डाफ, काँग्रेसचे दिनेश ढोले, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाचे ॲड. विष्णू पानतावणे, बहुजन वंचित आघाडीचे खुशाल डाफ, अनंता वाघ, कैलास महल्ले, अनिल निधान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. वडोदा जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण महिलेकरिता राखीव आहे. येथे काँग्रेसच्या अवंतिका लेकुरवाळे, भाजपच्या अनिता चिकटे, प्रहार जनशक्तीच्या सोनम करडभाजने, बरिएमंच्या शिल्पा भिवगडे, रुखमा खेडकर, मीना रामटेके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
बिडगाव पंचायत समिती गणातून काँग्रेसचे आशिष मल्लेवार, भाजपचे प्रमोद कातुरे, बहुजन वंचित आघाडीच्या मृणाली जामगडे, शिवसेनेचे कपूर चांभारे, अजित जामगडे, महालगाव पंचायत समिती गणातून भाजपच्या वंदना हटवार, काँग्रेसच्या सोनू कुथे, बहुजन वंचित आघाडीच्या यशोदा वर्मा, प्रतिमा ठाकरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरविंद हिंगे, नायब तहसीलदार सारिका धात्रक, रणजित दुसावार, एस. एन. कवटी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.
काँग्रेसने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या तर भाजपने पंचायत सभापती उमेश रडके, तालुकाध्यक्ष किशोर बेले, रमेश चिकटे, विशाल चामट यांच्या नेतृत्वात शक्तिप्रदर्शन केले. प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार घुले व छत्रपाल करडभाजने यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीची सत्ता आहे. आगामी १९ जुलैला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पाेटनिवडणुकीत महाआघाडी एकत्र निवडणूक लढणार असल्याचे असे सांगितले होते. परंतु महाआघाडीत एकमत न झाल्याने कामठी तालुक्यात वडोदा, गुमथळा जिल्हा परिषद सर्कल व महालगाव, बिडगाव पंचायत समिती गणातील पोटनिवडणुकीकरिता प्रहार जनशक्ती व शिवसेनेने स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाआघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले.