लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २०२२मध्ये होणार आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने या निवडणुकीसाठी सुधाकर अडबाले यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड केली आहे. संघटनेच्या प्रांतिक कार्यकारिणीने त्यांची बहुमताने निवड केली आहे. निवडणुकीच्या उमेदवारीसाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सुधाकर अडबाले व अनिल गोतमारे हे दोन उमेदवारांमध्ये रस्सीखेच होती. रविवारी झालेल्या मतदानात २३ मतदारांपैकी २१ जणांनी मतदान केले. त्यात सुधाकर अडबाले यांना १५ व अनिल गोतमारे यांना सहा मते पडल्याने अडबाले यांची उमेदवारी पक्की झाली असल्याची माहिती संघटनेचे कोषाध्यक्ष अविनाश बढे यांनी दिली.