भारतीय नागरिकत्व संशोधन कायदा हा देशातील कुठल्याही जाती, धर्माच्या विरोधात नाही. विरोध करणाऱ्यांनी विरोधापूर्वी कायदा समजावून घ्यावा, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले.
CAA : विरोध करण्यापूर्वी कायदा समजून घ्या : दयाशंकर तिवारी
ठळक मुद्देदेशातील कुठल्याही धर्म, जातीच्या नागरिकांच्या विरोधात कायदा नाही
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय नागरिकत्व संशोधन कायदा हा देशातील कुठल्याही जाती, धर्माच्या विरोधात नाही. जे शरणार्थी भारतात वास्तव्य करीत आहे. त्यांना संरक्षण देणारा कायदा आहे. सरकारने अमलात आणत असलेले सर्व कायदे काँग्रेस सरकारच्या काळात बनले आहे. फक्त भाजप सरकार त्याची अंमलबजावणी करीत असल्यामुळे विरोधी पक्ष कुटील राजकारण करून विशिष्ट धर्माला भडकवत आहे. विरोध करणाऱ्यांनी विरोधापूर्वी कायदा समजावून घ्यावा, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले.लोकजनशक्ती मोर्चाच्यावतीने सीएए च्या समर्थनात शनिवारी सक्करदरा चौकात जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला मुख्य वक्ता म्हणून दयाशंकर तिवारी उपस्थित होते. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, शुद्धचित्त बुद्ध विहारचे भंते रावजी पिंडक, शीख संप्रदायाचे चरणजितसिंग रेणू, नगरसेवक अॅड. धर्मपाल मेश्राम, अॅड. नरेंद्र गोंडाने, लोकजागृती मोर्चाचे संयोजक अॅड. रमण सेनाड, अशोक गोयल, देवेंद्र दस्तूरे, सुभाष कोटेचा आदी उपस्थित होते. सीएएच्या समर्थनात पोस्टकार्ड अभियान राबविण्यात आले. सभेला उपस्थित असणाऱ्या सर्वांनी पोस्ट कार्डवर सीएएचे समर्थन करून बॉक्समध्ये टाकले. हे पोस्टकार्ड मुख्य न्यायाधीशांना पाठविण्यात येणार असल्याचे सेनाड म्हणाले.याप्रसंगी दयाशंकर तिवारी यांनी सीएए कायद्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले १९५५ ला नागरिकता संशोधन कायदा करण्यात आला. वेळोवेळी त्यात बदलही करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी या कायद्यात कुठलेच बदल केले नाही. या कायद्याच्या कलम ५ मध्ये फेरबदल केले. कलम ५ मध्ये पूर्वी शरणार्थींना भारताचे नागरिकत्व हवे असेल तर येथे ११ वर्षाचा अधिवास ग्राह्य धरावा लागत होता. आता तो फक्त ५ वर्षाचा केला आहे. पण हे मोदींनी केल्यामुळे त्याला विरोध होत असल्याचे तिवारी म्हणाले. यावेळी त्यांनी सीएए, एनआरसी, एनपीआर का आले. त्याला कुणी समर्थन दिले. ती काळाजी गरज कशी आहे. यावर मार्गदर्शन केले. प्रसंगी अॅड. नरेंद्र गोंडाने यांनी सीएए ला समर्थन देत कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली. मुस्लिमांना अद्याप भारत समजलेला नसल्याचे मत अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमण सेनाड यांनी तर संचालन अभिजित मुळे यांनी केले.