ई-ऑक्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलिसांच्या ताब्यातील बेवारस वाहनांच्या खरेदीसाठी देशातील अनेक प्रांतांतून खरेदीदारांनी नागपूर गाठले. नव्हे पोलिसांनी अपेक्षित धरलेल्या किमतीपेक्षा पाचपट जास्त रक्कम देऊन या वाहनांची खरेदी केली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची कल्पकता अन् वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांच्या प्रयत्नातून शहर पोलीस दलात बेवारस वाहनांचा ई-लिलाव आज पार पडला अन् पोलीस दलाच्या तिजोरीत २० लाखांची घसघशीत गंगाजळी पडली.
विविध प्रकरणांच्या संबंधाने पोलिसांनी जप्त केलेली वाहने वर्षानुवर्षांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात बेवारस पडून असतात. ऊन, पाणी, वारा, धुळीमुळे ती सडून जातात. त्यातील बरीचशी वाहने निकामीही होतात. त्यामुळे ही वाहने परत घेऊन जाण्यास वाहनमालक उत्सुक नसतात. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात नुसतीच अडचण निर्माण होते. आधीच कमी असलेली जागा व्यापल्याने शहरातील बहुतांश पोलीस ठाण्यांत ही अडचण निर्माण झाली होती. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्यावर प्रशंसनीय तोडगा काढला. ज्यांची वाहने आहेत, अशा सर्व वाहनधारकांना दोन महिन्यांपूर्वी ठरावीक मुदतीत ती वाहने परत नेण्यासंबंधी लेखी सूचना देण्यात आल्या. ठरावीक मुदतीत वाहन नेले नाही किंवा सूचनापत्राला प्रतिसाद दिला नाही तर ती वाहने लिलावात काढली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले. त्याला दाद देत काही वाहनचालकांनी आपापली वाहने ठाण्यातून सोडवून नेली. मात्र, ३८८ वाहनांचा कुणीच वाली नसल्याने ती लिलावात विकण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. प्रक्रिया पारदर्शी करण्यासाठी ई-लिलाव करण्याचे ठरले. अमितेशकुमार यांनी त्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांची नियुक्ती केली. आवाड यांनी पोलीस मुख्यालयात ही वाहने एकत्रित करून त्याचे फोटो तसेच माहिती वेबसाइटवर अपलोड केली. ती बघण्यासाठी १५ दिवसांची मुदतही देण्यात आली. आश्चर्य म्हणजे, नेहमीच रस्त्यावरच्या कबाड्याकडून विकत घेतल्या जाणाऱ्या या वाहनांना विकत घेण्यासाठी नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूरसह राज्यातील अनेक शहरांतून तसेच मेटल ॲण्ड स्क्रॅप कार्पोरेशनसह तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि विविध राज्यांतून बडे खरेदीदार नागपुरात आले. त्यांनी उत्सुकता दाखवत कबाडात जमा असलेल्या या वाहनांची ऑनलाइन बोली लावण्यासाठी शहर पोलिसांसोबत लेखी करारनामा केला अन् आज १५ जानेवारीला ई-ऑक्शन पार पडले.
---
३.८२ ची अपेक्षा, मिळाले १९.४६ लाख
३८८ वाहनांची राखीव किंमत पोलिसांकडून ३ लाख, ८२ हजार ठेवण्यात आली होती. मात्र, खरेदीदारांनी या वाहनांसाठी चक्क १९ लाख, ४६ हजार रुपये मोजले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अशाच प्रकारे मुंबईतही ई-ऑक्शन केला होता. त्याच अनुभवातून पार पडलेल्या या ई-ऑक्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
----