नागपूर : कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शनिवारी व रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पण उत्पादन क्षेत्रासाठी हा लॉकडाऊन असणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर, उमरेड, भिवापूर, उप्पलवाडी, कामठी यासह अन्य औद्योगिक क्षेत्रातील जवळपास ३ हजारांपेक्षा जास्त उद्योग सुरू राहणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करण्याचा सूचना या औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या असोसिएशनकडून देण्यात आल्या आहेत.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनाच्या तडाख्यातून उद्योग ब-यापैकी पूर्वपदावर आले आहेत. शिवाय उद्योजकांकडे ऑर्डर वाढले आहेत. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने उद्योजक, कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन करून उद्योग सुरू आहेत.
कामगारांना ओळखपत्र
राज्य शासनाच्या लॉकडाऊन आदेशांतर्गत शनिवार व रविवारी रात्रीचा कर्फ्यू राहणार आहे. त्यामुळे सर्व औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी आणि कामगारांना उद्योजकांनी ओळखपत्र दिले आहे. अनेक कर्मचारी आणि कामगार शहर व ग्रामीण भागातून पोहोचतात. त्यामुळे त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून ओळखपत्राची गरज भासणार आहे.
उद्योगाची गती वाढली
बुटीबोरीत ८०० पेक्षा जास्त उद्योग सुरू असून कोरोना संक्रमणाच्या काळातून बाहेर निघाले आहेत. उद्योगांची गती वाढली आहे. विकेंड लॉकडाऊनचा आदेश उद्योगांसाठी लागू नाही. कर्मचारी आणि कामगारांतर्फे कोरोना नियमांचे पालन करण्यात येते. त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कारखाने शनिवारी आणि रविवारी सुरू राहतील.
प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.
विकेंड लॉकडाऊनमध्ये उद्योग सुरू राहणार
राज्य शासनाच्या आदेशानुसार विकेंड लॉकडाऊन अर्थात शनिवार आणि रविवारी कारखाने सुरू राहतील. कर्मचारी आणि कामगारांना कर्फ्यूचा त्रास होऊ नये म्हणून असोसिएशनने सर्वांना ओळखपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वसाहतीत ९०० पेक्षा जास्त उद्योग सुरू आहेत. उद्योगात शासन नियमांचे पालन करण्यात येते.
चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, हिंगणा एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन.
लॉकडाऊनचा उद्योगांवर परिणाम नाही
विकेंड लॉकडाऊन अर्थात शनिवार व रविवारी उद्योगांमध्ये उत्पादन सुरू राहणार आहे. कळमेश्वरमध्ये १०० पेक्षा जास्त कारखांन्यामध्ये बहुतांश कर्मचारी नागपूर तर कामगार कळमेश्वर भागातील आहेत. त्यांना ओळखपत्र दिले आहे. त्यामुळे त्यांना ये-जा करण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही. कारखान्यांमध्ये कोरोना नियमांवर भर आहे.
अमर मोहिते, अध्यक्ष. कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशन.