नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिल्डरच्या घरात बुधवारी दुपारी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लागायचा असतानाच बेसा भागातील एका पेट्रोल पंप संचालकाच्या घरीही धाडसी घरफोडी झाल्याचे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आले आहे.
विक्रम विठ्ठलराव नारनवरे हे पेट्रोल पंपाचे संचालक सहपरिवार बुधवारी पचमढीला गेले होते. गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ते परत आले. तेव्हा त्यांना दाराचे कुलूप तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे आणि हुडकेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. श्वानपथक आणि तसेच ठसेतज्ज्ञांच्या पथकालाही बोलवून घेण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंत चोरट्यांनी नेमका कोणता ऐवज लंपास केला, ते स्पष्ट झाले नव्हते.
---