- ३०१५ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद
- महाविकास आघाडी-भाजपसमर्थित पॅनलमध्ये टक्कर
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सरासरी ७८.७६ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजाविला. कोरोनाला न घाबरता ग्रामस्थांनी गावकारभाऱ्यांची निवड करण्यासाठी सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी केली होती. मतदान केंद्रावर प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी मतदान केंद्राच्या बाहेर ग्रामस्थ आणि राजकीय गटांच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाविषयक नियमांना हरताळ फासल्याचे दिसून आले. जिल्ह्यात सर्वाधिक ९०.७१ टक्के मतदान मौदा तालुक्यात झाले.
जिल्ह्यात एकूण १३० नियोजित ग्रामपंचायतींपैकी सोनपूर (कळमेश्वर) व जटामखोरा (सावनेर) या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यासोबत कुही तालुक्यातील देवळी कला ग्रामपंचायतीची निवडणूक मतदार यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे १२७ ग्रामपंचायतींच्या १,०८६ जागांसाठी सकाळी ७.३० वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली. एकूण ३,०१५ उमेदवाराचे भाग्य शुक्रवारी मशीनबंद झाले. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध भाजपसमर्थित पॅनल अशी लढत होत आहे. १३ तालुक्यांत ४८५ मतदान केंद्रांवर निवडणूक घेण्यात आली.
आजी- माजी मंत्र्यांचे स्वगावात मतदान
कोराडी (ता. कामठी) आणि पाटणसावंगी (ता. सावनेर) येथील निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पाटणसावंगी येथील मतदान केंद्रावर पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार तर कोराडी येथे भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजाविला.
ईव्हीएममध्ये एका ठिकाणी बिघाड
ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हीएमबाबत फारशा तक्रारी दिसून आल्या नाही. नागपूर ग्रामीण तालुक्यात धामणा लिंगा येथील वॉर्ड क्रमांक १च्या मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदानाची प्रक्रिया तासाभरासाठी खोळंबली. यानंतर मशीन बदलून मतदान सुरू करण्यात आले. सावनेर तालुक्यातील पोटा (चनकापूर) ग्रा.पं.च्या मतदान केंद्र क्रमांक २६१ येथे ईव्हीएममध्ये बिघाड असल्याचा आक्षेप एका मतदाराने घेतला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी तपासणी केली असताना ईव्हीएममध्ये कोणताही बिघाड दिसून आला नाही.
अतिरिक्त मतदान केंद्र
उमरेड तालुक्यातील चनोडा ग्रामपंचायतीमधील चिखलधोकडा येथे अतिरिक्त मतदान केंद्र देण्यात आले. येथील नागरिकांसाठी तब्बल १५ किलोमीटर अंतरावर केसलापूर येथे मतदान केंद्र होते. मतदारांसाठी त्रासदायक ठरू नये, यासाठी चिखलधोकडा येथे अतिरिक्त मतदान केंद्राची व्यवस्था केल्या गेली.
सोमवारी मतमोजणी
मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर तालुकास्तरावरील स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यात आल्या. सोमवारी (दि. १८) तेराही तालुक्यांत नियोजित केंद्रांवर सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी ४ वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
तालुकानिहाय मतदान (टक्के)
नरखेड : ८१.४१
काटोल : ८६.४२
कळमेश्वर : ७८.९६
सावनेर : ६९.३९
पारशिवनी : ८०.५७
रामटेक : ७६.९४
मौदा : ९०.७१
कामठी : ७७.८७
हिंगणा : ७७.०२
उमरेड : ८५.१५
भिवापूर : ७९.०६
कुही : ८४.१४
नागपूर (ग्रा.) : ५६.३२