लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य भारतातील बहुसंख्य सोने-चांदी व्यापारी नागपूरच्या सराफा बाजारावर विसंबून असतात. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १५ मार्चपासून लागू झालेल्या टाळेबंदीमुळे हे व्यापारी नागपुरात येऊ शकले नाहीत. शिवाय, ग्राहकी चौपट झाल्याने पहिल्या दोन दिवसात सराफा बाजार कोलमडला आहे.
कोरोना संक्रमणाच्या सावटात मार्च २०२० पासूनच सराफा बाजाराला टाळेबंदीची खीळ बसली आहे. त्यातून सारवासारव करण्याचा प्रयत्न होत असतानाच पुन्हा एकदा टाळेबंदीने सराफा बाजार जायबंदी झाला आहे. नागपुरात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आदी ठिकाणचे सराफा व्यापारी सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात. या प्रत्येक जिल्ह्यातील व्यापारी नागपुरात येण्याचा एक निश्चित दिवस ठरला आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या दुष्प्रभावात लागू झालेल्या नागपुरातील टाळेबंदीने या सर्व जिल्ह्यातील व्यापारी थांबले आहेत. अनेकांचे ऑर्डर्स रखडले आहेत. हे व्यापारी येत नसल्याने स्थानिक इतवारी सराफा बाजारातील कारागीर बेकार बसले आहेत.
-----------------
दरदिवसाला होते ५० कोटींची उलाढाल
नागपूरच्या सराफा बाजारात ग्राहक, लहान व्यापारी आणि मोठ्या व्यापाऱ्यांची मिळून अंदाजे ५० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. उत्सवाच्या काळात ही उलाढाल शंभर कोटींच्या वर असते. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने अनेक व्यापारी मोठ्या आशेवर होते. मात्र, पुन्हा लागू झालेल्या टाळेबंदीने ती आशा फोल ठरली आहे. मोठ्या घराण्यापर्यंत मर्यादित झालेल्या या व्यापारात तग धरू बघणाऱ्या लहान व्यापाऱ्यांची मोठीच गोची झाल्याचे दिसून येत आहे.
---------------
टाळेबंदीमुळे अडकलीय असोसिएशनची आमसभा
नागपूर सराफा असोसिएशनच्या कार्यकारिणीची मुदत एक वर्षापूर्वीच संपली आहे. नवीन कार्यकारिणीच्या निवडीसाठी वार्षिक आमसभा होणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनचे सत्र सुरू असल्याने नवी कार्यकारिणी अद्याप निवडली गेली नाही.
-----------
कारागिरी ठप्प, आर्थिक संकट
मोठ्या प्रतिष्ठानांसोबतच बाहेरगावाहून येणाऱ्या लहान व्यापाऱ्यांचा हा व्यवसाय कारागिरांवर विसंबून असतो. मात्र, टाळेबंदीची घोषणा होताच आणि गेल्यावर्षीची भीती लक्षात घेता बंगाल, गुजरात येथील अनेक कारागिरांनी आपल्या गृहनगराकडे जाण्यालाच पसंती दिली आहे. शिवाय, सोने-चांदी खरेदी करता येत नसल्याने कामेही राहिली नाहीत. त्यामुळे, कारागिरी पूर्णत: ठप्प पडली आहे. कारागिरांवर आर्थिक संकट पुन्हा एकदा ओढवणार आहे.
- अजय खरवडे, सहसचिव : नागपूर स्वर्णकार कारागीर असोसिएशन
----------
लॉकडाऊनला पर्याय शोधा
लॉकडाऊन अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही. टाळेबंदीमुळे घरापासून ते व्यापार सर्वच कोलमडले आहेत. वर्षभराच्या नुकसानीनंतर तग धरू पाहणाऱ्या लहान व्यापाऱ्यांची स्थिती पुन्हा बिकट होणार आहे. मार्केट बंद करणे हा पर्याय नाही. दुसरा पर्याय गांभीर्याने शोधावा.
- किशोर धाराशिवकर, अध्यक्ष, नागपूर सराफा असोसिएशन
................