नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी शहरातील नेहरूनगर, मंगळवारी तसेच धरमपेठ झोनमधील अतिक्रमणधारकांवर कारवाई केली. विभागाच्या पथकाने ६८ अतिक्रमण हटवून शहरातील फुटपाथ मोकळे केले.
धरमपेठ झोनमधील गोकुळपेठ मार्केटमध्ये फूलविक्रेत्यांनी झोपडे बांधून अतिक्रमण केले होते. मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने येथील पाच झोपडे तोडले. एवढेच नव्हे विक्रेत्यांकडील पारडेही जप्त करण्यात आले. व्हीआयपी रोड ते अलंकार टॉकिज मार्गावर फूटपाथवरील चहाटपरी हटविण्यात आली. येथील दोन झोपडे तोडण्यात आले. सीताबर्डी परिसरात मोदी क्रमांक तीन येथे अस्थायी दुकानदारांना पळवून लावण्यात आले. यशवंत स्टेडियम परिसरातील एका खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीने केलेले बांधकाम भुईसपाट करण्यात आले. मंगळवारी झोनमध्ये मंगळवारी बाजार ते सदर येथील हल्दीराम, तसेच कस्तुरचंद पार्क सभोवतालचे अतिक्रमण हटविण्यात आले. या परिसरात ३५ अतिक्रमण हटवून १० ठेले जप्त करण्यात आले. नेहरूनगर झोनअंतर्गत जगनाडे चौक ते केडीके कॉलेज रस्त्याच्या दोन्ही भागावरील अतिक्रमण हटविण्यात आले. सक्करदरा चौकात ३३ अतिक्रमण हटविण्यात आले. या परिसरात २५ ठेले जप्त करण्यात आले. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त महेश मोरोणे यांच्या मार्गदर्शनात विविध झोनच्या सहायक आयुक्तांनी ही कारवाई केली.
...........