नागपूर : उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा करंट लागल्यामुळे प्रियांश आणि पीयूष संजय धर (वय ११) या जुळ्या भावांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अखेर बिल्डर आनंद नारायणराव खोब्रागडे (वय ४६, रा. नवा नकाशा संकल्प शाळेजवळ) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्यासोबतच या चिमुकल्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या महापालिकेच्या नगर रचना विभागाचे अधिकारी आणि वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांवर पोलीस कधी कारवाई करतात, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जरीपटक्यातील सुगतनगरात खोब्रागडे याने एसबी-९ आरमोरर टाऊन सिटीच्या नावाने इमारतीचे बांधकाम केले. या इमारतीवरून उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची लाईन गेलेली असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करून महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीच्या बांधकामाला परवानगी दिली. अशा धोक्याच्या ठिकाणी बांधकाम केल्यास आणि तेथे राहायला आलेल्या किंवा त्यांच्याकडे आलेल्या मंडळीपैकी या विद्युत वाहिनीच्या संपर्कात कुणी आल्यास त्याला करंट लागून मृत्यू होऊ शकतो, याची जाण असूनही आरोपी बिल्डर खोब्रागडेने तेथे बांधकाम केले. सुरक्षेच्या संबंधाने आवश्यक उपाययोजना केल्या नाही आणि इमारतीस महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या तत्कालीने संबंधित अधिकाऱ्यांनी बांधकामास परवानी देऊन खोब्रागडे याला मदत केली. संजय धर हे कमाल चौक पाचपावली परिसरात राहतात. ३१ मे रोजी त्यांची प्रियांश आणि पीयूष ही जुळी मुले मावशीच्या घरी आले होते. सायंकाळी ते तेथे खेळत असताना विद्युत वाहिनीच्या संपर्कात आले आणि करंट लागल्याने गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान या दोघांचाही करुण अंत झाला. केवळ आर्थिक लाभासाठी आरोपींनी केलेल्या धोकादायक कृत्यामुळे प्रियांश आणि पीयूष या दोघांचे नाहक बळी गेले. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे जरीपटका पोलिसांनी आरोपी बिल्डर तसेच नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कलम ३०४, १०९ अन्वये गुन्हा दाखल केला. बिल्डर गजाआड, बाकीच्यांचे काय?बुधवारी रात्री खोब्रागडेला अटक केली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करून त्याचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला. या प्रकरणात बिल्डरएवढेच संबंधित विभागाचे अधिकारीही दोषी आहेत. पोलीस त्यांना कधी अटक करणार, असा प्रश्न आहे. त्या संबंधाने जरीपटका पोलिसांकडे विचारणा केली असता चौकशी सुरू असल्याचे मोघम उत्तर जरीपटका पोलिसांकडून मिळाले.
बिल्डर खोब्रागडेला अटक
By admin | Updated: June 23, 2017 02:13 IST