नागपूर : जिल्हा परिषदेचे गेले आर्थिक वर्ष कोरोनामुळे अतिशय काटकसरीचे गेले. सरकारने निधीला कपात लावली. योजना राबविण्यात आल्या नाहीत. गेल्या वर्षीचा निधी जिल्हा परिषदेला अजूनही प्राप्त झाला नाही. गेल्या तीन वर्षांच्या बजेटचे अवलोकन करून समतोल बजेट सादर करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे वित्त सभापती भारती पाटील यांनी सांगितले.
तिजोरीत ठणठणात असताना उगाच फुगीर बजेट सादर करणे योग्य नाही. येणाऱ्या आर्थिक वर्षात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सरकार किती हात मोकळा करते हे सुद्धा बघणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी कृषी विभागाला वैयक्तिक योजनांचा लाभ देऊ शकले नव्हते. शिक्षणाच्याही काही योजना राबविता आल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी आरोग्याबरोबरच कृषी व शिक्षणावर जास्त तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीचा जिल्हा परिषदेला मिळणारा निधी लवकरात लवकर मिळावा, म्हणून संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू आहे. दोन वर्षांचा समतोल साधून बजेट तयार केले आहे. कुठल्याच विभागावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली असल्याचे पाटील म्हणाल्या.